वाहतूक विभागाकडून प्रतिबंध,कल्याण शहरातील २२ रस्त्यांवर वाहने उभी करण्यास
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक भागात मागील तीन वर्षापासून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेली उड्डाण पुलाची कामे, रेल्वे स्थानक भागात रस्ते अडवून बसणारे फेरीवाले, बाजारपेठांमध्ये कल्याण शहरा बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने कल्याण शहरात वाहने उभी करण्याची समस्या गंभीर झाली आहे. शहरात वाहन कोंडीचे प्रमाण वाढल्याने वाहतूक विभागाने येथील २२ रस्त्यांवर वाहने उभी करण्यास बुधवार पासून वाहन चालकांना प्रतिबंध केला आहे. तर, १५ रस्त्यांवर वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी यासंदर्भातची अधिसूचना मंगळवारी जाहीर केली. २२ रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याने याविषयी कोणाला काही हरकत असेल तर त्यांनी वाहतूक विभागाच्या ठाणे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त डॉ. राठोड यांनी केले आहे.
कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानक भागात दिवंगत दिलीप कपोते हे एकमेव वाहनतळ आहे. कल्याण शहर परिसरातून नोकरीसाठी रेल्वेने जाणारा बहुतांशी नोकरदार आपल्या दुचाकी, चारचाकी वाहने रेल्वे स्थानक भागातील वाहनतळ, रस्त्यांवर उभी करून इच्छित स्थळी जातो. ही वाहने तो कपोते वाहनतळात उभी करून ठेवतो. या वाहनतळाची क्षमता दाखल होणाऱ्या वाहनांपेक्षा कमी असल्याने बहुतांशी वाहन चालक आपली चारचाकी, दुचाकी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील गल्लीबोळ, अरूंद रस्ते, इमारती, सरकारी कार्यालयाच्या आडोशाने उभी करून ठेवतात. ही वाहने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत.
या वाहनांच्या बाजुला फेरीवाले पदपथ, रस्ते अडून बसतात. त्यामुळे इतर वाहनांना या अडथळ्याचा त्रास सहन करावा लागतो. अलीकडे कल्याण पश्चिमेत वाहन कोंडीचे प्रमाण वाढल्याने वाहतूक विभागाने कल्याण पश्चिमेतील अनेक रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाहने सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रतिबंधित रस्त्यावर उभी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
वाहने उभी करण्यास प्रतिबंध रस्ते
पत्रीपूल ते लालचौकी, जुना आग्रा रस्ता, दुर्गाडी ते गोविंदवाडी वळण रस्ता, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक, नेहरू चौक ते श्री देवी रूग्णालय, सुभाष चौक ते मुरबाड रस्ता शासकीय विश्रामगृह, दीपक हॉटेल ते पुष्पराज हॉटेल, साधना छेद रस्ता ते झुंझारराव बाजार, कराची मेडिकल ते आर्चिस गॅलरी, गुरूदेव हॉटेल ते बस आगार, पाठारे नर्सरी ते आंबेडकर रस्ता, शिवाजी महाराज चौक ते फुले चौक, स्टेट बँक ते मॅक्सी ग्राऊंड, पौर्णिमा चौक ते बिर्ला महाविद्यालय, सहजानंद चौक ते संतोषी माता रस्ता वल्लभ चौक, काझी रुग्णालय ते काळी मस्जिद, दक्षिण मुखी मारूती मंदिर ते मोहिंदरसिंग शाळा, लालचौकी ते पारनाका, खडकपाडा सर्कल ते पोलीस ठाणे, संदीप हॉटेल ते वाणी विद्यालय, प्रेम ऑटे ते शहाड रेल्वे स्थानक, प्रेम ऑटो ते बिर्ला महाविद्यालय, आंबिवली स्थानक ते मोहने बाजार, डी. बी. चौक ते मुख्य चौक.
वाहने उभी करण्याची सुविधा
श्रीदेवी रुग्णालय ते वल्लीपीर चौक, शिवाजी चौक ते शंकरराव चौक, शंकरराव चौक ते अत्रे मंदिर, गांधी चौक, शंकरराव चौक ते पारनाका, स्टेट बँक ते प्रेम ऑटो मुरबाड रस्ता, कर्णिक रस्त्यावर अंबर वडापाव ते स्टार स्कॅनिंग, सिंडिकेट ते आयुक्त बंगला, बिर्ला कॉलेज ते आरटीओ, सहजानंद ते अहिल्याबाई चौक, कौतवाल चौक ते खडकपाडा सर्कल, शक्ती चौक ते गोल्डन पार्क, मोहिंदरसिंग ते क्रोमा शोरूम, लालचौकी ते आधारवाडी, साई चौक ते प्रांत ऑफिस, वाणी विद्यालय ते साई चौक.