कुलाब्यातील झोपडपट्टीचा पुनर्विकास कधी होणार ?
मुंबई, ता. ३० : राज्याचा कारभार हाकला जातो, अशा कुलाबा विधानसभा मतदारसंघात एकीकडे नव्याने उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारती आणि कॉर्पोरेट कार्यालये आणि दुसरीकडे कोळीवाडा आणि झोपडपट्टी वस्त्या असे स्वरूप आहे. मात्र, एवढी वर्षे होऊनही कुलाब्यातील कोळीवाडा आणि झोपडपट्टीधारकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत.
राज्याच्या दक्षिण टोकावरील असलेल्या कुलाबा विधानसभा मतदारसंघ मुंबईची नव्हे तर देशाची ओळख आहे. मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा असलेला दक्षिण मुंबई हा बहुभाषिक लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील कुलाबा परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे. कुलाब्यात गुजराती आणि मराठी भाषिक मतदारांची संख्या जास्त आहे. सीएसएमटी, चर्चगेट, कफ परेड, कुलाबा, मरीन लाइन्स, मशिद बंदर आणि काळबादेवी या विभागाचा मतदारसंघात समावेश होतो. या भागात गुजराती आणि मराठी मतदारांची संख्या अधिक आहे. तसेच अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय मतदारांचे प्रमाणही लक्षणीय आहे. अनेक वर्षांपासून कफ परेडमधील कोळीवाड्याच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही.
कुलाबा येथील ३२ एकर जमिनीवर असलेल्या झोपड्यांचा पुनर्विकास करण्याची घोषणा झाली; परंतु अद्यापही हा प्रकल्प कागदावरच रखडलेला आहे. झोपडपट्ट्यांच्या समूह पुनर्विकासात लक्ष घालणाऱ्या उमेदवारांना लोकसभेत मतदान करण्याचे मत अनेक कुलाबावासीयांनी व्यक्त केले.
सागरी सुरक्षेचा प्रश्न
कुलाबा भागात नौदलाचे पश्चिम मुख्यालय आहे. संरक्षणाशी संबधित संवेदनशील कार्यालये येथे आहेत. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी कुलाब्यातील बधवार पार्क येथून आले होते; मात्र एवढ्या वर्षानंतर सागरीकिनाऱ्याची सुरक्षा व्यवस्था हवी तेवढी भक्कम नाही. यासोबत आजूबाजूला झोपडपट्ट्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सुरक्षेची कमतरता राहिल्यास अजून एखादा दहशतवादी हल्ला होईल, अशी भीती रहिवाशांमध्ये आहे. कुलाब्यामध्ये बेकायदेशीर झोपडपट्ट्या वाढत आहेत. त्यावर प्रशासनाचा अंकुश दिसून येत नाही.
वाहतूक कोंडीने रहिवासी त्रस्त
कुलाबा परिसरात १२ महिने वाहतूक कोंडी असते. गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहाल हॉटेल येथे हजारो पर्यटक भेट देतात. त्यामुळे विशेषत: पर्यटन हंगामात, कुलाब्यातील रहिवाशांची प्रचंड गैरसोय होते. रिगल सिनेमापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत, रेडिओ क्लब आणि हनुमान मंदिरापर्यंतच्या चौथऱ्याभोवती प्रचंड वाहतूक कोंडी आहे. या भागात ठिकठिकाणी भुयारी मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते अडवून धरले आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडते.
पार्किंगची समस्या गंभीर
कुलाबामध्ये पार्किंगची मोठी समस्या आहे. कुलाब्यात मुख्य रस्त्यांना लागून असलेल्या गल्ल्या अरुंद आहेत; पण मतदारसंघात अनेक कार्यालयेही आहेत. या कार्यालयांना भेटी देण्यासाठी येणारे नागरिक याच अरुंद गल्ल्यांमध्ये वाहने उभी करतात. त्यामुळे येथील मूळ रहिवाशांना दिवसा स्वत:चे वाहन बाहेर काढण्यात अडचणी येतात.
काय समस्या?
– कुलाब्यातील कोळीवाड्याचा जागेचा प्रश्न
– झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास
– वाढत्या झोपडपट्ट्या
– सागरी सुरक्षा अजूनही सक्षम नाही
– भुयारी मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत अडथळे
– पार्किंगची समस्या
– म्हाडाच्या जुन्या इमारतींचा पुर्विकास