ठाकरे गटाचा सवाल ? राज ठाकरे म्हणाले होते, दुसऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही, आता सभा घेऊन कोणाचं पोर खेळवणार?
मुंबई : मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेवरून शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवतीर्थावर सभेसाठी 17 तारखेला मनसेने अर्ज केला आहे. शिवतीर्थावर ही सभा घेऊन राज ठाकरे कोणाची पोरं कडेवर खेळणार आहेत? कोणाच्या लग्नाच्या वरातीत राज ठाकरे आणि मनसे नाचणार आहे? असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी निशाणा साधला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. अनिल परब म्हणाले. राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की मी इतरांची पोरं कडेवर खेळवणार नाही. मग आता जर उमेदवार त्यांचा नाही तर शिवतीर्थावर सभा कोणासाठी घेणार आहे? आम्ही ज्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्याच दिवशी आम्ही महापालिकेकडे शिवतीर्थ आम्हाला सभेसाठी मिळावे यासाठी अर्ज केला आहे. सगळं काही रेकॉर्डवर आहे. आम्ही रस्त्यावर सभा घेणार नाहीत. आम्हाला आमची स्वतःची पोरं आहेत. 22 पोरांसाठी आम्ही शिवतीर्थावर सभा घेत आहे. जर शिवतीर्थावर सभा घेता आली नाही तर इतर आम्ही बीकेसी आणि इतर जागांचा विचार करु.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावरून देखील अनिल परब यांनी खोचक टोमणा मारला आहे. ईडी चौकशीला सामोरे जाताना हा माणूस ढसाढसा रडत होते. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना आता मुंबईतून उमेदवारी मिळालीय. तसंच भाजपला विनंती आहे की, रविंद्र वायकर, यामिनी जाधव, राहुल शेवाळे यांच्या प्रचाराला किरीट सोमय्या यांना स्टार प्रचारक करावं अशी खोचक प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिलीय. हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली. या विषयी बोलताना अनिल परब म्हणाले, हेमंत गोडसे यांना येथे नाशिकमध्ये कुठेही फायदा होणार नाही. सगळ्यांनी तिथे आपली जागा आहे असा आग्रह केला होता त्याचा फटका गोडसे यांना बसेल. प्रत्येकाला आपला उमेदवार नाशिक मध्ये द्यायचा होता.