समोर आली महत्त्वाची माहिती,सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार?
दहावी बारावीच्या निकालाची विद्यार्थ्यांसोबतच पालक, शिक्षक सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संपूर्ण राज्यात परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. मंडळाकडून कित्येक महिन्यांपासून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी काम सुरू होते. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे या परीक्षेच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच हा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकालही या महिन्यात जाहीर होणार आहे, मात्र त्याआधी दिशाभूल करणारी एक नोटीस सध्या व्हायरल होत आहे. त्या नोटीसमध्ये सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज म्हणजेच १ मे रोजी दुपारी १ वाजता लागणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ही माहिती खोटी असून सीबीएसई पीआरओ रमा शर्मा यांनी बोर्डाच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे स्पष्ट सांगितलं आहे.
सीबीएसई बोर्डाचे सचिव हिमांशू गुप्ता यांनी यापूर्वी सांगितले की, १० वी आणि १२ वीचे निकाल मेमध्ये जाहीर केले जातील. उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झाली असून, निकाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. गेल्यावर्षी १० वी आणि १२ वीचा निकाल १२ मे रोजी जाहीर झाला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाकडून लवकरच निकाल जाहीर केला जाऊ शकतो. अगोदर बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. दरम्यान, विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की, ते त्यांचे १० वी आणि १२ वी बोर्डाचे निकाल डिजिलॉकरवरदेखील पाहू शकतात.विद्यार्थ्यांनी जाणून घ्या डिजिलॉकरवर नोंदणी आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे डाउनलोड कसे करावे. डिजिलॉकरवर १० वी आणि १२ वीचे निकालपत्र अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे डिजिलॉकर खाते असणे आवश्यक आहे.शालेय प्रमाणपत्र आणि मार्कशीट व्यतिरिक्त आधार कार्ड, कोविड १९ लसीकरण प्रमाणपत्र, वाहन नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्सची सुविधा डिजिलॉकरवर उपलब्ध आहे. आपण या ॲपवर एसएससी मार्कशीट, एचएससी मार्कशीट, रेशनकार्ड, निवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र या सुविधेचा लाभ घेऊ शकता. आपली सर्व महत्त्वाची कागदपत्रे या लॉकरमध्ये ठेवली जाऊ शकतात.