सत्ताकारण

विरोधकांच्या आरोपांवर जानकरांचं वक्तव्य; अजित पवारांचा उल्लेख करत म्हणाले…“संविधानाला हात लावू देणार नाही”,

भाजपावर केलेल्या टीकेला रासपचे नेते महादेव जानकर यांनी उत्तर दिलं आहे.

भारतीय जनता पार्टीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला आहे. देशात सरकार स्थापनेसाठी ५४३ पैकी २७२ जागा जिंकणं आवश्यक असतं. मात्र भाजपाप्रणित एनडीएला ४०० जागा जिंकायच्या आहेत. यावरून विरोधी पक्ष भाजपा आणि एनडीएवर टीका करत आहेत. “त्यांना देशाचं संविधान बदलायचं आहे, लोकशाही पायदळी तुडवायची आहे, म्हणूनच भाजपावाले ४०० पार जागा जिंकण्याच्या गोष्टी करत आहेत”, असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. एका बाजूला सत्ताधारी ‘४०० पार’ची घोषणा देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष म्हणत आहेत की, आम्ही देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक लढत आहोत. यंदा जर एनडीए ४०० पार गेली तर ही देशातली शेवटची लोकसभा निवडणूक असेल.विरोधकांच्या या टीकेला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी उत्तर दिलं आहे. जानकरांचा पक्ष काही दिवसांपूर्वीच महायुतीत दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजपावर टीका करणारे जानकर आता महायुतीत आल्यानंतर भाजपाची बाजू मांडत आहेत. विरोधकांच्या संविधान बदलण्याच्या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना जानकर म्हणाले, मी स्वतः मागासवर्गीय आहे. त्यामुळे मी संविधान बदलू देणार नाही.महादेव जानकर म्हणाले, एक लक्षात ठेवा आम्हीसुद्धा मागासवर्गीय आहोत. एक मागासवर्गीय माणूस संविधान कसं काय बदलेल? खरंतर लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी, लोकांना गोंधळात टाकण्यासाठी विरोधकांची ही सगळी नाटकं चालू आहेत. वेगवेगळी नाटकं करण्यासाठी हे लोक वाट्टेल त्या गुगल्या टाकत आहेत. या देशातला कुठलाही पंतप्रधान, जगातला कुठलाही शक्तिशाली नेता भारताचं संविधान बदलू शकत नाही. उलट माझं त्यांना (विरोधख) म्हणणं आहे की काँग्रेसने ८० वेळा घटना बदलली. मग तुम्ही तिथे काय केलं? आम्ही एकदाही असं काही केलं नाही. आमचं दहा वर्षे सरकार होतं, मात्र आम्ही तसं काहीच केलं नाही. आम्ही मागासवर्गीय आहोत, आम्ही कसे काय घटनेला हात लावून देऊ? आम्ही घटना बदलू देणार नाही. एनडीएत अजित पवार यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, माझा पक्ष देखील धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे आम्ही तसं काही होऊ देणार नाही.दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष दावा करतायत की, भाजपासह एनडीएचे नेते ‘अब की बार ४०० पार’चा नारा देत असले तरी यंदाच्या निवडणुकीत त्यांचे २०० खासदारही निवडून येणार नाहीत. यावर प्रतिक्रिया देताना महादेव जानकर म्हणाले, तुमच्या (विरोधक) २०० जागा येत असतील तर तुमचा पंतप्रधान कोण होणार आहे ते तरी सांगा. तुमचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार त्याचं नाव तरी सांगा. मी आत्ता ठामपणे सांगतोय, आम्ही या निवडणुकीच्या निकालानंतर देशात सरकार स्थापन करतोय. आम्ही एनडीएचं सरकार बनवतोय आणि मी भावी मंत्री म्हणून बोलतोय. देशात सरकार आमचंच बनणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button