अजित पवार म्हणाले, दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या!तुम्हीच अग्रवालला वाचवण्यासाठी CP ना फोन केला का?
पुणे ; अपघात प्रकरणावर जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही अजित पवारांनी जास्त भाष्य केलं नाही. तसेच, याप्रकरणात त्यांच्याकडून कारवाईसंदर्भात माहितीही दिली जात नाही. त्यामुळे, अजित पवारांच्या भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंजली दमानिया यांनी याबाबत केलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अपघाताची घटना घडल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचे आरोप होत आहेत. मात्र, केवळ आमदारानेच नाही तर अजित पवारांनीच पुणे पोलिस आयुक्तांना फोन केला का, असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला होता. मी कधीच कोणाला सोडवण्यासाठी फोन करत नाही. मला एखाद्या प्रकरणात फोन करायचा असेल तर मी पोलीस अधिक्षकांना करेन, ग्रामीणचा विषय असल्याचे ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकांना करेन, असे म्हणत पुण्यातील घटनेत अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय.पत्रकार मित्रांनो, तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं, मीही सांगितलं. याप्रकरणी कुठलाही दबाव नाही, कुणीही पळवाट काढता कामा नये, जो कुणी दोषी असेन त्याला शासन झालं पाहिजे. मी दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या, असे म्हणत पुणे प्रकरणात फोन केल्याचा आरोप अजित पवारांनी फेटाळून लावला. तसेच, जेव्हा आम्ही विरोधी पक्षात असतो तेव्हा आम्ही म्हणतो राजकीय दबाव आहे. जेव्हा ते विरोधी पक्षात आहेत, तेव्हा तेही म्हणतात राजकीय दबाव आहे, ही बोलण्याची पद्धत आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. मी त्या दिवशी एका चॅनेलवर बघतिलं, एका लोकप्रतिनीधीनेच थेट पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप केला. एका जबाबदार व्यक्तीने, 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीने सीपींवर आरोप करताना पुरावा तर दिला पाहिजे, नुसता आरोप करण्यात अर्थ नाही, असे म्हणत अजित पवारांनी नाव न घेता आमदार रवींद्र धंगेकरांना लक्ष्य केलं.
अंजली दमानिया यांनी पुण्याचे पालकंमत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. ‘मी एक ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये मी माझ्या मनातील शंका उपस्थित केल्या होत्या. पुण्याच्या भीषण अपघातात दोन जणांचा जीव घेतला. एका श्रीमंताच्या मुलाला वाचवण्यासाठी सर्व पोलीस यंत्रणा काम करत आहे, असे काहीसे चित्र होते. त्याच्यामागे कोण होते? अशी शंका माझ्या मनात होती. म्हणून मी ते ट्वीट डीलिट केली. परंतु माझी शंका आता खरी ठरत आहे की काय असे वाटत आहे. मी माध्यमात बातमी पाहिले की, अजित पवारांनी पुण्याच्या आयुक्तांना फोन केला. हीच शंका माझ्या मनात होती. प्रत्येक गोष्टीत बोलणारे अजित पवार पहिले चार दिवस एकही शब्द बोलले नाही. मी सकाळी उठून काम करतो म्हणारे पुण्याचे पालकमंत्री अपघाताबद्दल त्यांनी एक शब्द देखील काढला नाही. प्रत्येकवेळी सुनील टिंगरेंचे नाव पुढे येत होते. पण ही सारवासारव कोणासाठी चालली होती?, असा सवाल दमानिया यांनी विचारला आहे.पुण्यातील घटनेत पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला आहे. पोलिसांनी योग्य प्रकार सीडीआर काढल्यामुळेच मुळापर्यंत या घटनेचे धागेदोरे असल्याचं लक्षात आलं. हा जो मुलगा होता, त्याचे रक्ताचे नमुने रिप्लेस करुन दुसरे नमुने घेण्यात आले होते. मात्र, त्याचे रक्ताचे नमुने पोलिसांकडे असल्यामुळे याचा पर्दाफाश करण्यात आला. त्यामुळे, जे डॉक्टर यात सहभागी होते, त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी, पोलीस पूर्णपणे मुळाशी अन् तळाशी गेल्याशिवाय थांबणार नाही, असे स्पष्ट शब्दात फडणवीस यांनी सांगितले.