त्या रात्री नक्की काय घडलं?‘बेबी केअर सेंटर’ लागलेल्या आग प्रकरणात धक्कादायक खुलासे;
विवेक विहार येथील बेबी केअर न्यू बॉर्न रुग्णालयामध्ये शनिवारी रात्री भीषण आग लागली, या घटनेत सात नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला असून पाच बालके गंभीर जखमी झाली आहेत. रुग्णालयाचे मालक डॉ. नवीन खिची आणि अन्य एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.‘मिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार बहुतेक पालकांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूबद्दल आणि रविवारी घडलेल्या घटनेबद्दल बातम्यांद्वारे, मित्र किंवा कुटुंबाद्वारे कळले. कारण पोलिसांनी आणि रुग्णालयाने त्यांना या घटनेची माहितीच दिली नाही.ही घटना कशी घडली? पोलिसांच्या तपासात काय माहिती समोर आली आहे? याबद्दल जाणून घेऊ या.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खाजगी नवजात शिशु रुग्णालयाच्या परवान्याची वैधता संपली होती. अग्निशमन विभागाकडून कोणतीही मंजुरी नसताना हे रुग्णालय सुरू होते. दिल्ली सरकारच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) बेबी केअर न्यू बॉर्न चाइल्ड रुग्णालयाला जारी केलेल्या परवान्याची वैधता ३१ मार्च २०२४ रोजीच संपली होती. ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, “रुग्णालयाला जारी केलेल्या कालबाह्य परवान्यात केवळ पाच खाटांची परवानगी आहे,” असे पोलिस उपायुक्त (शहदरा) सुरेंद्र चौधरी यांनी सांगितले. मात्र, शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली, त्यावेळी १२ नवजात बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान असे आढळून आले की बेबी केअर न्यू बॉर्न चाइल्ड रुग्णालयाच्या आणखी तीन शाखा आहेत, ज्या दिल्लीच्या पंजाबी बाग, हरियाणाच्या फरीदाबाद आणि गुरुग्राममध्ये आहेत.कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालयात अग्निशामक यंत्रणा बसविण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या रुग्णालयात इमर्जन्सी एक्झिटही नव्हती. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयाला विभागाकडून मंजुरीही नव्हती. “इमारतीला फायर एनओसी नाही. आम्ही सोमवारी एनओसीशी संबंधित कागदपत्रेदेखील तपासू,” असे डीएफएसच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याची विनंती करत वृत्तसंस्थेला सांगितले. दुमजली इमारतीत ठेवलेले ऑक्सिजन सिलिंडर फुटल्याने शेजारील इमारतींचे नुकसान झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.रहिवासी मुकेश बन्सल यांनी दावा केला की, रुग्णालयाच्या इमारतीत अनधिकृत ऑक्सिजन रिफिलिंग सिलिंडरचे काम केले जात होते. “आम्ही स्थानिक नगरसेवकांकडेही याबाबत तक्रार केली होती, पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे सर्व पोलिसांच्या नाकाखाली घडत होते”, असा दावा बन्सल यांनी केला. बन्सल यांनी असेही सांगितले की, ते रुग्णालयाच्या शेजारी राहत होते, परंतु सिलिंडर रिफिलिंगच्या बेकायदा कामामुळे त्यांना दुसर्या ठिकाणी घर शोधावे लागले. २१ वर्षीय देवांश गुप्ता यांनी सांगितले की, पहिल्या मजल्यावर एनआयसीयू होते, हे रुग्णालय तळमजल्यावर ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रासाठी ओळखले जायचे. पोलिसांनी सांगितले की ते या दाव्यांचादेखील तपास करत आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्याने असेही सांगितले की, या रुग्णालयात बीएएमएस (आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रिया पदवी) डॉक्टरांचा समावेश होता, जे मुलांची काळजी घेण्यास पात्र नव्हते. “तपासादरम्यान आम्हाला कळले की, नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात नवजात मुलांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर पात्र नव्हते; कारण त्यांनी केवळ बीएमएस ही पदवी प्राप्त केली होती. सेवा दलाच्या सदस्याने दावा केला की, रुग्णालयाच्या इमारतीला आग लागताच रुग्णालयातील कर्मचारी पळून गेले.
दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेबी केअर न्यू बॉर्न रुग्णालयात शनिवारी रात्री ११.३० वाजता आग लागली. मालक नवीन खिची हे बालरोग औषधाचे एमडी आहेत आणि ते दंतचिकित्सक असलेल्या पत्नी डॉ. जागृती यांच्याबरोबर हे रुग्णालय चालवतात. आणखी एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, इमारतीच्या बाहेर उभी असलेली रुग्णवाहिका आणि स्कूटी याशिवाय दोन बुटिक, इंडसइंड बँकेचा एक भाग, शेजारच्या इमारतीचा काही आणि तळमजल्यावरील दुकानाचेही नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्थानिक लोक आणि शहीद सेवा दल या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य मदतीसाठी सर्वप्रथम धावून आले.रहिवासी रवी गुप्ता म्हणाले की, काही स्थानिक लोक इमारतीच्या मागील बाजूने चढले आणि एक एक करून मुलांना बाहेर काढले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या १६ गाड्या वापरण्यात आल्याचे विभागीय अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल यांनी सांगितले. जिल्हा दंडाधिकारी (शाहदरा) यांनी दिल्ली विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या अहवालानुसार, घटनेच्या वेळी रुग्णालयात १२ नवजात बालकं होती. एकाचा जागीच मृत्यू झाला, तर ११ जणांना आजूबाजूच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले, तेथे पोहोचताच सहा बालकांना मृत घोषित करण्यात आले.