निवडणूक कामकाजात बडतर्फ शिक्षकांची नेमणूक? निलंबित 48 शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
नाशिक ; निवडणूक प्रक्रिया 20 मे रोजी पार पडली असून येत्या चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र, निवडणूक कामकाजात निलंबित शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असल्याची तक्रार आजाद समाज पक्षाने शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात केली आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती संस्थेतील शिक्षक, सेवक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदांच्या 48 बेकायदेशीर मान्यता रद्द करण्यात आली आहे.मात्र, असे असताना देखील निलंबित केलेल्या शिक्षकांची निवडणूक कामकाजात नेमणूक करण्यात आली असल्याचा आरोप आझाद समाज पक्षाचा वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे या शिक्षक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असताना देखील लोकसभा निवडणुकीत त्यांना जबाबदारी देण्यात आल्याने या बाबत आक्षेप घेत या संबंधीत रितसर लेखी तक्रार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे आझाद समाज पक्षाने दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामकाजांसाठी निवडणूक आयोगाने शासकीयसह खाजगी संस्थांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांना देखील निवडणूक कामकाजात सामावून घेतले होते. मात्र खाजगी संस्थांमधील 48 बेकायदेशीर मान्यता रद्द संस्थेतील कार्यमुक्त केलेले कर्मचारी, ज्यांच्यावर गुन्हे दाखल असून त्यांच्याविरुद्ध शासनाने वेतन वसुलीचे आदेश काढले असताना देखील त्यांना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजात का जबाबदारी दिली? या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही आझाद समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याविषयी आयोजित पत्रकार परिषद घेत आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांनी माहिती दिली. सोबतच या बाबत तक्रार देऊनही कारवाई न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिकच्या मतदारसंघाची राज्यभरात चर्चा सुरु होती. मतदानाच्या दिवशी देखील नाशिक लोकसभा राज्यभरात गाजली. अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांवर आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जुन्या नाशिकमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये बाचाबाची झाली. नाशिकमध्ये बोगस मतदान सुरु असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. अनेक मतदान केंद्रांवर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे दिसून आल्याने नाशिकची चर्चा राज्यभरात झाली.