मुंबई

लोकल सेवा विलंबाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर रूजू,

महा मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल पकडण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली.

मुंबई :  तीन दिवसीय महा मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल पकडण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली. लोकलमध्ये शनिवारी सकाळपासून वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षा विभाग, सफाई कर्मचाऱ्यांसह खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक होती. लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने उशिरा का होईना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर रुजू झाले.मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील १०-११ फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी ब्लॉकची मालिका सुरू आहे. तसेच आता अंतिम कामे करण्यासाठी सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लॉक सुरू आहे. ठाणे येथे ५-६ फलाटांचे रुंदीकरण केले जात असून ६३ तासांचा ब्लॉक सुरू आहे. तीन दिवसीय महा मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील ९३० लोकल फेऱ्या रद्द, तर ८९० लोकल फेऱ्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.ब्लॉक कालावधीत लांबपल्ल्याच्या ७४ रेल्वेगाड्या रद्द आणि १२२ रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये शनिवारी सर्वाधिक म्हणजे ५३४ लोकल फेऱ्या रद्द आणि ६१३ लोकल फेऱ्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शनिवारी प्रवाशांना प्रवास करताना अडचणी येत आहेत. लोकल सेवा २० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच कल्याण – ठाणेदरम्यान एका मागे एक लोकलच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी पहाटे ३.५१ ची कसारा – सीएसएमटी लोकल परळपर्यंत चालवण्यात आली. तसेच त्यानंतरच्या लोकल भायखळा, दादर या स्थानकांपर्यंत चालवण्यात आल्या. शनिवारी रात्रीपासून सीएसएमटी – वडाळा रोडदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळादरम्यान अप आणि डाऊन जलद, धीमा मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना दादरलाच उतरून पश्चिम रेल्वेने पुढील प्रवास करावा लागत आहे. तसेच काही प्रवासी बेस्ट, एसटी व पर्यायी वाहतुकीने कामाच्या ठिकाणी पोहचले.ठाणे येथे फलाट क्रमांक ५ येथे पहाटे ४.०५ वाजेपर्यंत आरसीसी बॉक्स टाकण्यात आले. तसेच पोकलेन आणि रोलरची वाहतूक करण्यासाठी वॅगन ठाण्याहून कल्याण दिशेकडे नेण्यात आली. पहाटे ५.३० वाजता वॅगनच्या मदतीने पोकलेन आणि रोलर मुलुंड गुड्स स्थानकात पाठविण्यात आले. तसेच सध्या आरसीसी बॉक्स टाकलेल्या ठिकाणी काम सुरू आहे. दोन आरसीसी बॉक्समधील पोकळी सिमेंट-काँक्रीटने भरण्याचे काम सुरू असून या बॉक्सला फलाटाचे स्वरूप या दिले जात आहे. तसेच सीएसएमटी येथे इंटरलॉकिंगचे काम करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button