सत्ताकारण

पदवीधर मतदारसंघात अभिजीत पानसे विरुद्ध निरंजन डावखरे यांची लढत. मनसेविरोधात भाजपनं अखेर उमेदवार रिंगणात उतरवलाच;

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधरसाठी अभिजीत पानसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच भाजपकडून विधान परिषदेवर असलेले निरंजन डावखरेंचं काय होणार? याच्या चर्चा रंगल्या होत्या. मनसेनं जाहीर केलेला उमेदवार महायुतीचा की, मनसे स्वबळावर लढणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यामुळे भाजपकडून राज ठाकरेंची मनधरणी केली जाणार का? अशाही चर्चा सुरू होत्या. अशातच आता भाजपनं विधान परिषदेसाठी यादी जाहीर केली आहे. कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

महायुतीत विधानसभेचं बिगुल वाजण्याआधीच जागांवरून रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच त्यापूर्वी राज्याच्या राजकारणात विधान परिषदेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी, भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केली. राज ठाकरेंची ही खेळी भाजपसाठी धक्का असल्याचं बोललं जात आहे.  कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो आणि याच मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी अचानक अभिजीत पानसेंचं नाव जाहीर करून भाजपची पुरती गोची केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

राज्यात बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अतिरीक्त मदतीमुळे, यंदाही निरंजन डावखरेंसाठी ही लढत सोपी मानली जात होती. पण ऐनवेळी राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे, महायुतीच्या गोटात मिठाचा खडा टाकल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारांची घोषणा करत कोकण पदवीधरसाठी निरंजन डावखरेंच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे यंदा कोकण पदवीधरसाठी अभिजीत पानसे विरुद्ध निरंजन डावखरे यांची लढत होणार आहे. दरम्यान, कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button