मनपा आयुक्तांचे स्मार्ट सिटीला निर्देश,गंगापूर रस्त्यावरील केबीटी चौक वगळता अन्य प्रस्तावित सिग्नल रद्द
नाशिक:आमदार देवयानी फरांदे यांनी केबीटी चौक वगळता इतर भागातील प्रस्तावित सिग्नल रद्द करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी गंगापूर रस्त्यावरील केबीटी चौक वगळता इतर प्रस्तावित सिग्नल रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.शहरीकरणामुळे गंगापूर रस्त्यावरील वाहतुकीत मागील काही वर्षात कमालीची वाढ झाली आहे. या भागात शाळा, महाविद्यालयांची संख्या अधिक असल्याने वाहनांची वर्दळ असते. अनेक चौकात वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. सद्यस्थितीत गंगापूर रस्त्यावर गंगापूर नाका (डोंगरे वसतिगृहालगतचा चौक), जेहान चौक व पाईप लाईन रोड (आनंदवल्लीच्या पुढील चौक) अशा तीन ठिकाणी सिग्नल यंत्रणा अस्तित्वात आहे. वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी शहरात विविध २२ ठिकाणी सिग्नल बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ही प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या २२ पैकी १० सिग्नल हे गंगापूर रस्ता भागात प्रस्तावित होते. यामध्ये सप्तरंग चौक, विद्याविकास चौक, केबीटी चौक, हुतात्मा चौक, भोसला टी पॉइंट, मॅरेथॉन चौक, प्रसाद चौक, दत्त चौक, डीके नगर, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल चौक यांचा समावेश होता.गंगापूर रोड भागात इतके सिग्नल बसविल्याने वाहतूक सुरळीत होण्याऐवजी ठिकठिकाणी वाहतूक थांबे तयार होण्याचा धोका आहे. परिणामी, या भागास वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागेल. वाहनधारकांसह नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होईल. या प्रकारे १० सिग्नल प्रस्तावित करण्याआधी स्मार्ट सिटी कंपनी आणि वाहतूक पोलिसांनी कुठल्याही लोकप्रतिनिधी वा नागरिकांशी चर्चा केली नाही, याकडे आमदार फरांदे यांनी लक्ष वेधले. या मनमानी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत त्यांनी सिग्नलची कामे तत्काळ रद्द करण्याची मागणी मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे केली. मंजूर काम एका ठिकाणी आणि काम दुसऱ्या ठिकाणी सुरू असल्याच्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त करीत अशा प्रकारे परस्पर काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली. यावेळी मनपा आयुक्त डॉ. करंजकर यांनी स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कामाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली. नागरिकांची मागणी असणाऱ्या केबीटी चौक वगळता गंगापूर रोड परिसरातील इतर सर्व प्रस्तावित सिग्नल यंत्रणा रद्द करण्याचे आदेश दिले. या बाबतची माहिती फरांदे यांनी दिली.