maharastra

देशभरात मान्सून कधी सक्रिय होणार?

जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. जूनमध्ये देशाने जवळ जवळ सर्वच भागांत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती अनुभवली आहे.

भारतात साधारणतः ७० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस जून-सप्टेंबर महिन्यात नैऋत्य मान्सूनमुळे पडतो. हवामानशास्त्रीयदृष्ट्या, मान्सून मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अंदमान समुद्रावर पोहोचतो आणि केरळमार्गे मुख्य भूभागात प्रवेश करतो. केरळमध्ये एरवी १ जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. मध्य भारतापर्यंत नैऋत्य मौसमी वारे वेगाने पुढे सरकतात, मात्र त्यानंतर या वार्‍यांची गती मंदावते. मान्सून साधारणपणे जूनच्या अखेरीस उत्तर प्रदेश, दिल्ली आणि आसपासच्या भागांत पोहोचतो आणि १५ जुलैपर्यंत संपूर्ण देशात मान्सूनचा पाऊस पडतो.मान्सून लवकर किंवा वेळेत भारतात दाखल झाला असला, तरी चार महिन्यांच्या हंगामात देशभरात पुरेसा पाऊस पडेल की नाही, हे सांगता येत नाही. तसेच, मान्सून उशिरा दाखल झाल्यास संपूर्ण हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल की पुरेसा, याचीही शक्यता वर्तविणे कठीण असते. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरातील एकत्रित पाऊस अनेक घटकांवर अवलंबून असतो. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) या हंगामात सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ला निनाच्या परिस्थितीमुळे यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस बरसणार आहे. सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. अल निनोचे रूपांतर ला निनामध्ये होत आहे; ज्यामुळे पावसाचे अभिसरण वाढत आहे, असे आयएमडी अधिकार्‍यांनी सांगितले आहे. ला निनोचा भारतीय मान्सूनवर सकारात्मक परिणाम होतो.मान्सून १९ मे रोजी अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर आला. मान्सून ३० मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर त्याच्या सामान्य तारखेच्या दोन दिवस अगोदरच पोहोचला. नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुराच्या काही भागांमध्येही सहा दिवस लवकरच मान्सून दाखल झाला. ३० मे नंतर, मौसमी वारे वेगाने पुढे सरकत होते. १० जूनपर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबार बेट, केरळ, लक्षद्वीप, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातही दाखल झाला होता.१० जूनपर्यंत देशभरात ३६.५ मिमी पाऊस पडला. या सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मान्सूनचे तीन ते पाच दिवस लवकर आगमन झाले. ११ जूनपासून, मान्सूनचा वेग मंदावला. गेल्या आठवडाभरात संपूर्ण भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत आहे. मंगळवारी नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, विजापूर, सुकमा, मलकानगिरी, विजयनगरम आणि इस्लामपूरमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. ज्या राज्यांमध्ये मान्सूनचे उशिरा आगमन झाले आहे, अशा राज्यांमध्ये सर्वात कमी पाऊस पडला आहे. यात ओडिशा (उणे ४७ टक्के), पश्चिम बंगाल (उणे ११ टक्के), बिहार (उणे ७२ टक्के) आणि झारखंड (उणे ६८ टक्के) या राज्यांचा समावेश आहे. मणिपूर, मिझोराम, लक्षद्वीप, नागालँड, केरळ, अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटांवर पुन्हा वाढलेली उष्ण आणि कोरडी स्थितीदेखील एकूण देशातील पावसाच्या कमतरतेसाठी कारणीभूत आहे.

आयएमडीने ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली. मान्सून पूर्व भारताच्या दिशेने पुढे सरकला. मुख्यत: २६ मे रोजी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपट्टीवर आलेल्या रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग वाढला. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे जूनच्या सुरुवातीला पूर आणि भूस्खलनही झाले. अरबी समुद्रातील पश्चिम/नैऋत्य वाऱ्यांनी जूनच्या सुरुवातीला दक्षिण द्विपकल्पात मान्सूनला पुढे नेले. पश्चिम किनाऱ्यावरील अनेक चक्रीवादळांमुळे १० जूनपर्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतर सिनोप्टिक सिस्टीमच्या अनुपस्थितीमुळे नैऋत्य वाऱ्यांची गती कमी झाली आणि मान्सून मंदावला. “पूर्वेकडील वाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बंगालच्या उपसागराची मान्सूनची शाखा पुढे जाऊ शकली नाही,” असे आयएमडीचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डी. शिवानंद पै म्हणाले.मान्सून सध्या अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहे. या आठवड्याच्या उत्तरार्धात कोकण आणि उत्तर कर्नाटकात पावसाचा जोर वाढेल. मात्र, देशातील इतर भागांत पाऊस नसेल. या आठवड्याच्या अखेरीस, मान्सून महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत, पश्चिम बंगालच्या काही भागांत, ओडिशा, छत्तीसगड आणि बिहारचा काही भाग, तसेच किनारी आंध्र प्रदेशात पुढे सरकू शकेल. “जूनच्या अखेरीस मान्सून सक्रिय होईल अशी आमची अपेक्षा आहे,” असे डी. शिवानंद पै म्हणाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button