मुंबई

माजी मुंबई रेल्वे पोलीसआयुक्त कैसर खालिद यांचा जबाबात दावा,पोलीस कल्याणाच्या दृष्टीने जाहिरात फलकाला परवानग्या

माजी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी व्यावसायिक अर्षद खान याला ओळखत असल्याचे सांगताना पोलीस कल्याण निधीच्या दृष्टीने जाहिरात फलकाला परवानग्या देण्यात आल्याचा दावा केला आहे.घाटकोपरच्या जाहिरात फलक प्रकरणी तपास करत असलेल्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने आरोपी भावेश भिंडे, मनोज संघू, जान्हवी मराठे-सोनलकर आणि सागर पाटील यांना अटक करत त्यांच्याविरोधात न्यायालयात तीन हजार २९९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.जाहिरात फलक दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसह जखमी व्यक्ती, पालिका आणि मुंबई रेल्वे पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी अशा १०२ साक्षीदारांच्या जबाबांचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी (११ जुलै) माजी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचा जबाब नोंदविला आहे. खालिद यांनी गुन्हे शाखेकडे नोंदविलेल्या जबाबात पोलीस कल्याण निधी वाढविण्यासाठी जाहिरात फलकांना परवानग्या देण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच, त्यांनी अर्षद खानला ओळखत असल्याचे म्हटले आहे.दुर्घटनाग्रस्त होर्डिंगच्या आधी इगो मीडिया प्रा. लि. कंपनीला ई-निविदा प्रक्रियेतून तीन जाहिरात उभारण्यासाठी परवानग्या मिळाल्या होत्या. याप्रकरणातील रोख रक्कम विविध कामांच्या बदल्यात विविध खात्यांमध्ये जमा करण्यात आली होती, अशी माहिती खानने दिली होती. याप्रकरणात पैशांचे व्यवहार तपासण्यासाठी अर्षद खान याच्याकडे पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.तत्कालीन रेल्वे पोलीस आणि नागरी कर्मचारी, स्ट्रक्चरल इंजिनीअर यांनी कदाचित बेकायदा गोष्टींकडे डोळेझाक केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याबाबत गुन्हे शाखा तपास करत आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात जाहिरात फलकाची रचना निकृष्ट दर्जाची असल्याचा अहवाल तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. बांधकाम उभारणीपूर्वी माती परीक्षणात पाच वेळा पायलिंग करायचे होते, परंतु जाहिरात फर्मने पाया बांधण्यासाठी निकृष्ट साहित्याचा वापर केला आहे. तपासणीही त्यावेळी झाली नाही. त्यामुळेच कदाचित सोसाट्याच्या वाऱ्याने १५ सेकंदात प्रचंड जाहिरात फलक कोसळले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button