maharastra

काल दहीहंडी मध्ये १२९ गोविंदा जखमी, सरकारी, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार;

यंदा मुंबईमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना रात्री उशिरापर्यंत १२९ गोविंदा जखमी झाले. यातील १९ गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेतदहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केईएम, नायर, शीव, कूपर या मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस व जी. टी. रुग्णालय यांनी सर्व तयारी सज्ज ठेवली होती. मंगळवारी सकाळपासून विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यास सुरुवात झाली. दहीहंडीचा उत्साह वाढत असतानाच गोविंदा जखमी होऊ लागले. मुंबईमध्ये १२९ गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आहेत.

केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन गोविंदांची प्रकृती गंभीर आहे. कुणाल पाटील (२०) याच्या पाठीच्या मणक्याला तर मनू खारवी (२५) याच्या डोक्याला मार लागला आहे.मुंबई महानगरपालिकेच्या विविध उपनगरीय रुग्णालयांमध्ये २७ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे जखमींमध्ये बालगोविंदांचाही समावेश आहे.सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या चार जखमींमध्ये दोन बालगोविंदांचा समावेश आहे. यामध्ये मोहम्मद झमीर शेख (६) हा सोसायटीतील दहीहंडी फोडताना पडून जखमी झाला. त्याच्या डाव्या हाताला फॅक्चर झाले आहे. यश विजय वाघेला (११) हा थर लावताना पडल्याने त्याच्या दंडाला फॅक्चर झाले आहे. त्यामुळे या दोघांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तर दोघांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. जी.टी. रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलेल्या चार गोविंदांपैकी शिवा गुप्ता या ११ वर्षीय मुलाचा समावेश आहे

सांताक्रूझ येथे दहीहंडी फोडताना उंचावरून पडून जखमी झालेल्या ३४ वर्षीय गोविंदाला बेशुद्धावस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या मणक्याला दुखापत झाल्याने त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.एम डब्ल्यू देसाई व कूपर रुग्णालयात प्रत्येकी एक, वीर सावरकर रुग्णालय आणि वांद्रे भाभा रुग्णालयात प्रत्येकी तीन, शताब्दी गोवंडी रुग्णालयात सहा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात १० जणांना उपचार करून घरी सोडले आहे. व्ही.एन. देसाई रुग्णालयात चौघांवर उपचार करण्यात आले.दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वत्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवरही कारवाई करण्यात आली. त्यात १३ हजार १४६ ई-चलन जारी करण्यात आले. त्याद्वारे एक कोटी पाच लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्यांवर २,७९१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून २१ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सिग्नल तोडणाऱ्या ९९३ चालकांवर कारवाई करण्यात आली.मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्रातील विविध भागात मंगळवारी गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणची गोविंदा पथके सकाळपासून मानाच्या दहीहंड्या फोडत पुढे जात होती. मुंबई-ठाण्यात मोठ्या पारितोषिकाच्या उंच दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस लागली होती. थर रचण्याचा नियमित सराव करणाऱ्या गोविंदा पथकांनी सकाळीच मुंबईतील उंच दहीहंड्या फोडून ठाण्याच्या दिशेने कूच केली. तर लहान गोविंदा पथकांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ठाणे गाठले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button