अमित ठाकरे यांची आदित्य ठाकरेंवर टीका,“तुम्ही लोकप्रतिनिधी असाल…”
महाराष्ट्र मुंबई माहीम विधान सभा उमेदवार : एकीकडे जागावाटप व इच्छुकांची चर्चा असताना दुसरीकडे महत्त्वाच्या लढतींकडे मतदारांसह राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं आहे. मुंबईच्या ३६ मतदारसंघांमधील काही चर्चेतल्या लढतींपैकी अशीच एक लढत म्हणजे अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे. ठाकरे घराण्याची ही तिसरी पिढी जरी दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत असली, तरी त्यांच्या उमेदवारांच्या निमित्ताने हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे या राजकीय स्पर्धेनंतर आता आदित्य ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे हा सामना महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळणार आहे.आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून अमित ठाकरेंना माहीम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधातील शिवसेना उमेदवार सदा सरवणकर उमेदवारी मागे घेण्याची जोरदार चर्चा रंगलेली असताना त्याविषयी आपल्याला काहीही ठाऊक नाही, असं म्हणत अमित ठाकरेंनी आपल्या विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. आज अमित ठाकरेंनी अर्ज भरण्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं.
मुंबईत अमित ठाकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सविस्तर भूमिका मांडली. “मी उमेदवारीबाबत देवाला काहीच साकडं घातलेलं नाही. मी देवाकडे कधीच काही मागितलेलं नाही. त्यानं मला खूप काही दिलेलं आहे. मी घरी पप्पांच्या पाया पडलो. बाळासाहेब ठाकरे माझे आजोबा असून त्यांच्या स्मृतीस्थळी आशीर्वाद घेऊन मी पुढे जाणार आहे. प्रबोधनकारांच्याही पुतळ्याच्या पाया मी पडणार आहे. हे आशीर्वाद मला पुढे नेतील”, असं अमित म्हणाले.दरम्यान, वरळी विधानसभेतील विकासावरून अमित ठाकरेनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “वरळी विधानसभा मतदारसंघात कामं झालेली नाहीत. संदीप देशपांडे तिथून नक्कीच जिंकतील. त्यांचं काम उत्तम आहे. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. तिथे विकासकामं झालेली नाहीत. तिथले आमदार लोकांसाठी उपलब्धच नव्हते. त्यांना भेटताच येत नव्हतं. तुम्ही लोकप्रतिनिधी असाल तर तुम्ही लोकांसाठी उपलब्ध असायला हवं. पण ते झालं नाही. त्यामुळेच मला वाटतं की आम्हाला उमेदवार द्यावा लागला”, असं ते म्हणाले.दरम्यान, गेल्या १० वर्षांत पर्यावरण खात्यानं मुंबईत शून्य काम केल्याचं अमित ठाकरे म्हणाले. असं म्हणातानाच त्यांनी आदित्य ठाकरेंनाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. “गेल्या १० वर्षांत पर्यावरण खात्यानं काहीच काम केलेलं नाही. आरेच्या प्रकल्पातही त्यांनी ३०-३५ हजार झाडं कापून घेतली. मी पर्यावरणासाठी काम करतच राहणार आहे”, असं ते म्हणाले