तब्बल १ कोटी १५ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त,ग्रामीण पोलिसांची पुण्यात मोठी कारवाई
गुटखा विक्री तसेच वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला होता. यापुर्वी पोलिसांनी पुण्यासह परराज्यात देखील गुटखा एजंटची धरपकड केली होती. त्यानंतर ही साखळी प्रथमच समोर आली होती.
पुण्याच्या वेशीवर म्हणजेच खेड शिवापूर टोलनाका परिसरात पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडला आहे. तब्बल १ कोटी १५ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त केला असून, एका टेम्पोतून तो आणला जात होता. राजगड पोलिसांनी ही कारवाई केली असून, याप्रकरणी चालकासह दोघांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दरम्यान पोलीस देखील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलताना दिसून येत आहेत.मल्लमा भिमाया दौडमनी (वय ३१, सध्या रा. कात्रज, मुळ, रा. मदगुनकी कर्नाटक), तुषार दिपक घोरपडे (वय २६, रा. जाभुळवाडी, हवेली) अशी अटक केलेल्यांची नवे आहेत. त्यांचे साथीदार स्वप्रील भालशंकर, बबलु पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजगड पोलीस ठाण्यातील कर्मचारी अक्षय सुभाष नलावडे यांनी तक्रार दिली आहे. रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास खेड शिवापूर टोलनाका परिसरातील शिवरे गावाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी केली आहे.
गुटखा बंदी असताना देखील पुण्यासारख्या शहरात गुटख्याची विक्री अन् वाहतूक खुलेआम होत असून वारंवार पोलिसांकडून गुटखा पकडला जात असताना गुटखा एजंट मात्र सुसाट सुटल्याचे दिसत आहे. या प्रतिबंधित पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत पोलीस विभागाच्या सहाय्याने होते. असे असताना पुण्यात मात्र, गुटखाबंदी ही कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक कारवायांमधून हे अधोरेखित देखील झाले आहे. शहरातील छोट्या मोठ्या टपऱ्यांवर सहजरीत्या गुटखा उपलब्ध होत आहे. दरम्यान, रविवारी सकाळी सातारा पुणे महामार्गावर गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह पथकाने शिवरे भागात सापळा रचून साताऱ्याहून पुण्याकडे येणारा टेम्पो पकडला. त्याची तपासणी केली असता टेम्पोत गुटख्याचा तब्बल १ कोटी १५ लाखांचा साठा आढळून आला. पोलिसांनी चालकासह दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत हा गुटखा त्यांनी कर्नाटकमधून आणल्याचे समोर आले आहे. पुण्यातील आरोपींचे साथीदार बबलू ,स्वप्नील यांच्याकडे हा साठा सोपविण्यात येणार होता. मात्र, यापूर्वीच पोलिसांनी कारवाई केली. राजगड पोलीस पुढील तपास करत आहेत.
शहरात अवैध व्यवसायासह गुटखा विक्री तसेच वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला होता.