मनसेकडून तृप्ती सावंतही मैदानात, अजित पवारांची धाकधूक वाढणार;
मुंबई: तृप्ती सावंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे प्रवेश करताच त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मात्र टेन्शन वाढणार आहे. तृप्ती सावंत या शिवसेनेचे माजी दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्धीकी आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वरूण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच तृप्ती सावंत यांना मनसेने य़ाठिकाणी उमेदवारी दिल्यामुळे त्याचा फटका वरूण सरदेसाई आणि झिशान सिद्धीकी या दोघांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे वांद्रे पूर्वचे उमेदवार दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर पराभूत झाले आणि काँग्रेसचे झिशान सिद्धिकी आमदार झाले होते. पण विश्वनाथ महाडेश्वरांचा हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. 2019नंतर तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी बाळा सावंत यांच्या निधनानंतर तृप्ती सावंत यांनी 2015 च्या पोटनिवडणुकीत खासदार नारायण राणेंचा पराभव केला होता. त्यावेळी या पोटनिवडणुकीत काँग्रेसने नारायण राणेंना उमेदवारी दिली होती. पण या लढतीतही नारायण राणेंचा सुमारे 20 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला.मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. वांद्रे पूर्व ही जागा सध्या काँग्रेसकडे असून जिशान सिद्दीकी हे येथील आमदार आहेत. यावेळी झिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर येथून निवडणूक लढवत आहेत, तर वरुण सरदेसाई हे शिवसेनेच्या यूबीटीमधून निवडणूक लढवत आहेत.त्यातच तृप्ती सावंत यांना पक्षप्रवेश देऊन मनसेनेही आपली खेळी खेळल्याचे दिसत आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री हे वांद्रे पूर्व हा मतदारसंघातच असल्याने शिवसेनेसाठी हा मतदारसंघ कायम प्रतिष्ठेचा राहिला आहे. मनसेने तृप्ती सावंत यांना प्रवेश दिल्यामुळे उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या गटाचेही टेन्शन वाढणार आहे.