बोईसर कंपनीच्या गोदामाला भीषण आग; परिसरात प्रदूषणकारी धुराची चादर
तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळील कारखान्याच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली
बोईसर:आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत गोदामातील तयार आणि कच्चामाल जळून खाक झाला. तर आगीमुळे बोईसर परिसरातील आकाशात मोठ्या प्रमाणात काळाकुट्ट धुर पसरल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागला.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात जवळील बेटेगाव येथील दोरखंड तयार करणाऱ्या रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज या कारखान्यातील गोदामाला गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे गोदामातील कच्चा आणि तयार माल जळाल्याने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. आगीची खबर मिळताच तारापूर अग्निशमन दल, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि पालघर नगरपरिषद यांच्या एकूण चार बंबानी तातडीने घटनास्थळी पोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. गोदामात साठा केलेल्या ज्वलनशील कच्च्या मालामुळे आग धुमसत असल्याने आकाशात मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरला होता. संपूर्ण बोईसर परिसरात काळा धूर पसरल्यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागला. तीन तासानंतर सकाळी दहा वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. आग लागल्याचे समजताच कारखाना आणि गोदाम परिसरातून कामगारांना वेळीच बाहेर काढल्याने कोणत्याही प्रकारचे जीवित हानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.