प्रजासत्ताक सोहळ्यासाठी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जोरदार स्वागत
इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना या ऐतिहासिक प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले .

२६ जानेवारी रोजी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक अतिशय खास दिवस आहे. हा दिवस आपल्या देशाच्या संविधानाच्या अंमलात येण्याचा आणि भारताला स्वतंत्र, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा दिवस आहे. यावर्षी, 2025 मध्ये, इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना या ऐतिहासिक प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले असून त्यांचे भारतात आगमन झाले आहे. ( दि. 25 जानेवरी) दिल्लीच्या हैद्राबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांची भेट घेतली. बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रबोवो यांचे जोरदार स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, “इंडोनेशिया भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य अतिथी देश होता. आज, आपण प्रजासत्ताकाचे 75 वर्षे साजरे करत आहोत आणि इंडोनेशिया या ऐतिहासिक क्षणाचा पुन्हा एकदा भागिदार बनला आहे. राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांचे भारतात स्वागत करणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे.”
बैठकीदरम्यान भारत आणि इंडोनेशियाच्या द्विपक्षीय संबंधांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दोन्ही देशाचे संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग व पुरवठा साखळीवर एकत्रित काम करण्याचा निर्णय झाला. याशिवाय, दोन्ही देश समुद्री सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि दहशतवादाविरोधी प्रयत्नांवर भर देण्यावर चर्चा करण्यात आली.फिनटेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सहकार्य मजबूत करण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. याशिवाय, भारत आरोग्य व अन्न सुरक्षा क्षेत्रात इंडोनेशियाला माहिती पुरवणार असून आपत्ती व्यवस्थापनासाठी संयुक्त सराव केले जातील. तसेच, प्रम्बानन हिंदू मंदिराच्या जतनासाठी भारत आपले सहकार्य देईल.राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांचे राष्ट्रपती भवनमध्ये ‘गार्ड ऑफ ऑनर’ने स्वागत करण्यात आले. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध, संरक्षण आणि व्यापारावर चर्चा केली. प्रबोवो यांनी म्हटले की, “इंडोनेशिया भारताला जवळचा मित्र मानतो. भारताने आमच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या पाठिंब्याची आम्ही कधीही विसरणार नाही.” यानंतर राष्ट्रपती प्रबोवो यांनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी बापूंच्या समाधीवर पुष्पार्पण केले. प्रबोवो यांच्यासोबत इंडोनेशियाचे परराष्ट्र राज्यमंत्री पबित्र मार्गेरिटा उपस्थित होते.