ठाणे

राष्ट्रीय हरित लवादाने बजावली पालिकेला नोटीस;गायमुख परिसरात बेकायदा कचराभुमी, महिनाभरात स्पष्टीकरण देण्याचे आदेश.

कचरा साठवणूक करून तो टप्प्याटप्प्याने डायघर भागात कचरा विल्हेवाट प्रक्रियेसाठी नेण्यात येत असल्याचे ठाणे पालिकेने स्पष्ट केले आहे.

ठाणे : बेकायदेशीर कचरा टाकल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने ठाणे महापालिकेला नोटीस बजावली आहे. या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई का केली नाही, याचे स्पष्टीकरण महिनाभरात देण्याचे आदेश लवादाने दिले आहे. दरम्यान, याठिकाणी केवळ कचरा साठवणूक करून तो टप्प्याटप्प्याने डायघर भागात कचरा विल्हेवाट प्रक्रियेसाठी नेण्यात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.घोडबंदर येथील गायमुख भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर येतो. हा परिसर इको-सेंसिटिव्ह झोन आणि तटीय नियमन क्षेत्रात येतो. या भागातील एका भुखंडावर पालिकेकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असून यामुळे पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तटीय नियमन क्षेत्र अधिसूचना २०११ तसेच इको-सेंसिटिव्ह झोन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत आहे. या कचऱ्यामुळे नैसर्गिक परिसंस्थेचे मोठे नुकसान होत असून, येथील जैवविविधता, जलस्रोत आणि वन्यजीव धोक्यात आले आहेत, असा आरोप ॲड. वैभव साटम यांनी केला आहे. ठाणे महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र तटीय झोन व्यवस्थापन प्राधिकरण आणि मीरा-भाईंदर महापालिका या सर्वांना यापूर्वीच कायदेशीर नोटीस, छायाचित्रे आणि तक्रारी सादर करण्यात आल्या होत्या. परंतु, कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप साटम यांनी केला आहे. या संदर्भात साटम यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या इको-सेंसिटिव्ह झोन आणि तटीय नियमन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कचरा टाकल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने ठाणे महापालिकेला नोटीस बजावली आहे. ठाणे महापालिकेने या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई का केली नाही, याचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश लवादाने दिले आहेत.

 पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच महापालिका आणि पर्यावरण विभाग यांचे वारंवार दुर्लक्ष आणि निष्क्रियता गंभीर प्रश्न निर्माण करीत आहे. जर तातडीने योग्य कारवाई झाली नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल. –  ॲड. वैभव साटम, याचिकाकर्ते  ठाणे जिल्हापरिषदेची ‘स्मार्ट’ वाटचाल, विविध योजना आणि कामांसाठी ॲप्लिकेशनची निर्मितीबेकायदेशीर कचरा टाकल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाकडून अद्याप कोणतीही नोटीस आम्हाला प्राप्त झालेले नाही. सर्व प्रक्रीयांचे पालन करण्यात येत आहे. गायमुख येथे केवळ कचरा साठवणूक करून तो टप्प्याटप्प्याने डायघर भागात कचरा विल्हेवाट प्रक्रियेसाठी नेण्यात येत आहे. – मनिष जोशी, उपायुक्त, ठाणे महापालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button