राहुल गांधींनी सांगितलं, कर्नाटकनंतर काँग्रेसचे मिशन मध्य प्रदेश!

दक्ष पोलिस न्यूज प्रतिनिधी (नवी दिल्ली) : कर्नाटकात काँग्रेसने भाजपला धूळ चारली आणि सरकार स्थापन केलं. कर्नाटकमध्ये मिळालेल्या मोठ्या यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. आता कर्नाटक पाठोपाठ मिशन मध्य प्रदेश असणार आहे. मध्य प्रदेशात कमळ फुलणार नाही यासाठी रणनिती तयार करणं सुरू आहे. तर दुसरीकडे आत्मविश्वास वाढल्याने कॉंग्रेसचीच सत्ता येईल असा दावा केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटक निकालाची मध्य प्रदेशात पुनरावृत्ती होईल असं म्हटलं आहे. काँग्रेस कर्नाटकातील कामगिरीची पुनरावृत्ती करेल आणि आगामी मध्य प्रदेश निवडणुकीत १५० जागा जिंकेल असं त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. या बैठकीला मध्यप्रेदशातील काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यामध्ये कमलनाथ, दिग्विजय सिंग यांच्या समावेश होता. राजस्थानचे वरिष्ठ नेतेही या बैठकीला हजर होते. यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलत हेसुद्धा उपस्थित होते.कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. भाजपला कर्नाटकमध्ये मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपला अवघ्या 66 जागांवर समाधान मानावं लागलं तर काँग्रेसने मुसंडी मारत 135 चा आकडा गाठला आणि विजय मिळवला.