maharastra

गांजातस्करी मुळे, साखर कारखाने असलेला प्रसिध्द जळगाव जिल्ह्यातील वनकोठे हे गाव चर्चेत…

जळगाव : ओडिशातून चोरट्या मार्गाने आणलेला गांजा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या तस्करांमुळे सध्या या गावाकडे वेगळ्या हेतूने पाहिले जात आहे. पोलिसांनी अलीकडेच १९ किलो गांजाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्यानंतर वनकोठे पुन्हा एकदा चर्चेत आले.एरंडोलहून कासोदाकडे जाताना लागणाऱ्या वनकोठे गावास सहकारी तत्वावर उभारण्यात आलेल्या वसंत साखर कारखान्यामुळे विशेष नावलौकीक काही वर्षांपूर्वी प्राप्त झाला होता. हंगामावर कारखाना सुरू असेपर्यंत वनकोठे अगदी गजबजून जायचे. आर्थिक उलाढाल वाढल्याने परिसरातील कासोदा, आडगाव, फरकांडे, बांभोरी आदी गावांमध्येही चैतन्य ओसंडून वाहत असे. मात्र, १९९९ मध्ये साखर कारखाना बंद पडला आणि वनकोठे परिसराची रयाच गेली. ऊस उत्पादक कापसासह अन्य पिकांकडे वळले. हातचा रोजगार गेल्याने तब्बल ८०० कामगारांना नाशिक, मुंबई, पुण्याची वाट धरावी लागली.

याच स्थितीचा फायदा घेत बेरोजगार झालेल्या गावोगावच्या तरूणांना गांजा तस्करीच्या जाळ्यात ओढण्याचे काम काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी केले. किंबहुना तेव्हापासून वनकोठे गाव गांजा तस्करीचे राज्यातील एक केंद्र बनले.एरवी जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वतालगतच्या चोपडा तालुक्यात गांजाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, स्थानिक गांजापेक्षा कितीतरी पटीने जास्त भाव ओडिशा राज्यातून महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आलेल्या दर्जेदार गांजाला मिळतो. गांजाची नशा करणारे देखील ओडिशातील गांजासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्यास तयार असतात. एरंडोल तालुक्यातील वनकोठे व परिसरात वास्तव्यास असलेले तस्कर त्यामुळे थेट ओडिशातून गांजा मागवण्यास प्राधान्य देतात.

नंतर त्याची मागणीनुसार बंदिस्ती करून नाशिक, मुंबई, पुणे मार्गे राज्याच्या इतर भागात विल्हेवाट लावतात. याच प्रयत्नातून ओडिशा राज्यात जाऊन गांजाची गाडी भरून आणणाऱ्या वनकोठे गावच्या पोलीस पाटलास २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती.कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिल्यांदा गांजा तस्कराच्या विरोधात मंगळवारी मोठी कारवाई झाली. चार महिन्यांपासून त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. यापुढेही कारवाईत सातत्य ठेवून तरूण पिढीला त्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. नीलेश राजपूत (सहायक पोलीस निरीक्षक, कासोदा, जि.जळगाव)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button