मुंबई

भरदिवसा तोतया पोलिसांचा मुंबईत सुळसुळाट; व्यापाऱ्याचे ७ लाख लुबाडले, दोघांना अटक

दक्ष पोलिस न्यूज प्रतिनिधी (मुंबई) : मुंबईमध्ये तोतया पोलिसांकडून लुटीच्या घटना कमालीच्या वाढल्या असतानाच लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी २४ तासांत दोन तोतयांच्या मुसक्या आवळल्या. राज भीमसेन कांबळे आणि राहुल पेडणेकर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. काळबादेवी परिसरात या तोतयांनी एका तरुणाकडून सात लाख रुपये लुटले होते. त्यांच्यावर इतर ठिकाणीही गुन्हे दाखल असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.काळबादेवी येथील पोपलवाडी परिसरातून स्वप्नील पोटे हे मालकाने दिलेले सात लाख रुपये घेऊन चालले होते. यावेळी दोन तरुण अचानक त्यांच्यासमोर आले. त्यांनी पोलिस असल्याचे सांगत स्वप्नील यांची झडती घेण्यास सुरुवात केली. दोघांनी त्यांना जबरदस्ती टॅक्सीमध्ये बसविले आणि तेथून निघाले. स्वप्नील यांच्याकडील सात लाखांची रोख रक्कम घेऊन त्याला टॅक्सीखाली उतरविले आणि पळून गेले. स्वप्नील यांनी याबाबत मालकाला कल्पना दिली आणि याबाबतची तक्रार लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात केली. पोलिस असल्याची बतावणी करून लुटण्यात आल्याने या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल भंडारे, उपनिरीक्षक रुपेश पाटील यांच्या पथकाने तोतया पोलिसांचा शोध सुरू केला.

पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरांचा मग घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या येण्याचा व जाण्याचा मार्गाचा शोध घेऊन लोकमान्य टिळक मार्ग, पायधूनी, भायखळा, दादर, सायन, माटुंगा, आझाद मैदान, माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्याच्या आवारातील फुटेजची झाडाझडती घेत असताना यामध्ये आरोपींचे चेहरे दिसले. त्यांची गुन्हेपद्धत, पोलिस रेकॉर्ड, त्यांचे फोटो हे सर्व खबऱ्यांसमोर ठेवले असता दोघांची माहिती मिळाली. त्यानुसार राज कांबळे यास माटुंगा येथून आणि राहुल पेडणेकर यास मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंड येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांचाही गुन्ह्यात सहभाग आढळताच त्यांना अटक करण्यात आली. तोतया पोलिसांच्या गुन्ह्यात इराणी टोळीचे सदस्य सक्रिय असतात. मात्र हे दोघे मुंबईतील असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर तपासण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button