मुंबई

नोव्हेंबरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत: कोस्टल रोड अंतिम टप्प्यात, दुसऱ्या बोगद्याचा पुढील आठवडय़ात ब्रेक थ्रू!

दक्ष पोलिस न्यूज प्रतिनिधी (मुंबई) : मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडचे ७५ टक्के काम सध्या पूर्ण झाले असून प्रकल्पातील दुसरा बोगदाही पुढील आठवडय़ात पूर्ण होत आहे. एकूण २०७२ मीटर लांबी असलेल्या दुसऱ्या बोगद्याचे ९९.३६ टक्के काम पूर्ण झाले असून आता केवळ १६ मीटर बोगदा खोदणे बाकी आहे. पुढील आठवडय़ात ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशीन ‘ब्रेक थ्रू’ करेल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. हा प्रकल्प नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे उद्दिष्ट आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान १०.५८  किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. १०.५८ किमीच्या कोस्टल रोड प्रकल्पात २ किमीचे दोन महाकाय बोगदे तयार करण्यात येत असून एका बोगद्याचे काम १० जानेवारी २०२२ ला पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे काम ९ एप्रिल २०२२ रोजी सुरू झाले असून ९९  टक्क्यांवर काम पूर्ण झाले आहे. पुढील आठवडय़ात हे काम पूर्ण होणार आहे. ‘मावळा’ या टनेल बोरिंग मशीनने हे काम केले जात आहे.

अशा मिळणार सुविधा

कोस्टल रोडमध्ये ७०  हेक्टर एवढे हरित क्षेत्र उपलब्ध होणार असल्याने हा प्रकल्प पर्यावणस्नेही ठरणार आहे. या ठिकाणी ८५६ वाहनांच्या पार्किंगसह प्रसाधनगृह, जॉगिंग ट्रक, सायकल ट्रक, फुलपाखरू उद्यान, सागरी पदपथ, खुले नाटय़गृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमिगत फुटपाथ, जेट्टी अशा नागरी सुविधा मिळणार आहेत. या प्रकल्पामुळे ३४ टक्के इंधनाची तर ७० टक्के वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button