मुंबई

वांद्रे स्थानकाबाहेरील फेरीवाले,वांद्र्याची बजबजपुरी; रिक्षावाल्यांना शिस्त कोण लावणार? प्रवाशांचा प्रश्न

मुंबई : वेड्यावाकड्या लावलेल्या रिक्षा… रिक्षाचालकांचा आरडाओरडा, डोकेदुखी होईल असा कमालीचा गोंगाट.. जमिनीवर सर्वत्र कचरा, धूळ, प्रदूषण… त्यातून वाट काढत पुढे जावे तर फेरीवाले, टपरीवाल्यांनी पदपथ अडवलेला… मध्येच एखादी बेस्टची बस रस्ता अडवून उभी… वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरची ही बजबजपुरी आहे. हजारो प्रवासी हे दररोज सहन करतात. हा परिसर स्वच्छ होऊन या भागाला कधी तरी शिस्त लागेल की नाही, असा सवाल मुंबईकरांनी केला आहे.  वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगत शिवसेनेच्या शाखेवर पालिकेने हातोडा चालल्यानंतर या परिसरातील अराजकतेचा विषय ऐरणीवर आला आहे. या भागातील झोपड्यांच्या तीन ते चार मजली टॉवर इतकाच रिक्षांचा विषय डोकेदुखी ठरला आहे. पालिका, वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्यानंतर एक दोन दिवस शिस्त लागते. त्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरू राहते. पलीकडे वांद्रे पश्चिमेला चांगली स्थिती आहे, अशातला भाग नाही. मात्र तिथे स्थानकाबाहेर मोठी जागा असल्याने प्रवाशांना ये-जा करताना थोडे सुसह्य होते.
पूर्वेकडील परिसर आधीच लहान असून त्यात रिक्षांचा मोठा अडसर आहे. रेल्वेच्या पुलावरून खाली पाऊल टाकताच प्रवाशांची कसरत सुरू होते. पुरेशा साफसफाई अभावी अस्वच्छता आणि कमालीचा बकालपणा या भागाला आला आहे. रिक्षा उभ्या असलेल्या ठिकाणीच बेस्टचे बस थांबे आहेत. एकीकडे रिक्षांची गर्दी दुसरीकडे रस्त्यात बस उभी राहते तेव्हा काही काळ येथे वाहतुकीची पार वाट लागते. रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरावर फेरीवाले, रिक्षा, टॅक्सी स्टँड असू नये. परिसर मोकळा असावा असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचे येथे सरार्स उल्लंघन केले जाते. मनमानी पद्धतीने रिक्षा उभ्या केलेल्या असतात. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाने येथे कधीच मर्यादा ओलांडली आहे. रिक्षाचालक गुटखा, मावा खाऊन कुठेही थुंकत असल्याने येथे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
रेल्वे स्थानकापासून बीकेसी, कुर्ला येथे जाण्यासाठी रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने त्याचा फायदा रिक्षाचालकांनी उठवला आहे. मीटर पद्धतीने प्रवासी न नेता एका रिक्षात चार प्रवासी कोंबून वाटेल तसे पैसे मागितले जातात. एका प्रवाशामागे २० ते ३० रुपयांची लूट होते, अशी माहिती प्रवाशांनी दिली.
रेल्वे स्थानकापासून पश्चिम द्रुतगती महामार्ग, कलानगर या भागात जाण्यासाठी प्रा. अनंत काणेकर मार्ग हा एकमेव पर्याय आहे. या मार्गावरील स्कायवॉक पाडल्यानंतर पादचारी, प्रवाशांचे हाल सुरू आहेत. याच मार्गावर एसआरए, वांद्रे न्यायालय आहे. पुढे काही अंतरावर म्हाडाचे कार्यालय आहे. हजारो नागरिक या रस्त्याने ये-जा करत असतात. पायी चालत जाणाऱ्या प्रवासी, नागरिकांना रस्त्यावरील अतिक्रमणे, टपऱ्या, कचऱ्याचे ढीग यातून वाट काढत पुढे जावे लागते. दुतर्फा पदपथ असले तरी ते नावाला आहेत. तिथे आधीच अतिक्रमण झालेले असल्याने असुविधांचा सामना करत रस्त्यावरून चालण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button