maharastraमुंबई

त्यांच्या धमकीचे उत्तर काय द्यायचे हे मी ठरवेल .राम शिंदेंचा परिषदेत इशारा

Maharashtra Monsoon Session 2023 : विधान परिषदेत आज (ता. 27 जुलै) राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड औद्योगिक वसाहतीबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नाला उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून उत्तर देण्यात आले.

पुढील तीन महिन्यात कर्जतमधील एमआयडीसीसाठी जमीन उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले. परंतु यावेळी विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सरकारला दिलेल्या इशाऱ्यामुळे संतापलेले यला मिळाले. (Ram Shinde warning without mentioning Rohit Pawar’s name on the Karjat-Jamkhed MIDC issue)

पावसाळी अधिवेशनाच्या या आठवड्याच्या सुरुवातीलाच विधान भवनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आमदार रोहित पवार हे आंदोलनाला बसले. कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी झालीच पाहिजे, या मुद्द्यावरून आक्रमक झालेले रोहित पवार हे एकटेच भर पावसात आंदोलनाला बसले होते. यावेळी त्यांची समजूत काढण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन गेले. या एमआयडीसीच्या संदर्भातील अधिसूचना ही अधिवेशन संपण्याच्याआधी निघेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितल्यानंतर पवारांनी आपले आंदोलन मागे घेतले.

आंदोलन मागे घेतल्यानंतर रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. एमआयडीसीसाठी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये परवानगी मिळाली. पण अधिसूचना मिळत नाही. माझ्या मतदारसंघातील युवकांच्या हक्कासाठी मी लढत आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शब्द दिला आहे. अधिसूचना अधिवेशन संपण्याच्या अगोदर निघणार आहे. राज्याचे मंत्री म्हणून मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. मी माझे आंदोलन मागे घेत आहे. उद्याची बैठक महत्त्वाची असेल. नाहीतर असंख्य युवा मुंबईत आंदोलन करतील. ही एमआयडीसी मंजूर झाली नाही तर, माझ्या मतदारसंघातील हजारो युवक येऊन मुंबईमध्ये आंदोलन करतील, असा इशारा रोहित पवार यांच्याकडून देण्यात आला. ज्याचा मुद्दा आज राम शिंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.

रोहित पवार यांचे नाव न घेता राम शिंदे यांनी विधान परिषदेत त्यांनी केलेल्या विधानांवर संताप व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या विधिमंडळाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विधानसभेचे सदस्य उपोषणाला बसले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी सचिन अहिर, शशिकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, कॅबिनेट मंत्री भेटायला गेले. कोणत्याही सदस्यावर अशी वेळ येऊ नये, त्यांचा सन्मान राखला पाहिजे. त्या सदस्याला सकारात्मक उत्तर मिळाले पाहिजे, यात कोणतेही दुमत नाही. पण त्या सदस्यांनी मंत्र्यांबाबत धमकीचे उद्गार काढल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला.

अनेक जणांचा वसा आणि वारसा या विधिमंडळाला लाभला आहे, असे सांगत राम शिंदे म्हणाले की, एका उच्च घराण्याचे सदस्य असलेले विधानसभेचे सदस्य कर्जत-जामखेड मतदारसंघाला माझा मतदारसंघ बोलत आहेत, त्यांच्याकडून अशा पद्धतीचे वक्तव्य कितपत योग्य आहे, असा प्रश्न शिंदे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. त्यांनी मला देखील बघून घेऊ, दाखवून देईल, अशा धमक्या दोन वेळा दिल्या आहेत. पण मला संरक्षण देणार की नाही माहीत नाही. पण मंत्र्यांना आणि सरकारला संरक्षण देणार का? असा प्रश्न देखील राम शिंदे यांच्याकडून विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला.

मी गृहमंत्री राहिलो आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये, लोकांच्यामध्ये या धमकीचे काय उत्तर द्यायचे ते मी ठरवेल. त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असा इशारा राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता दिला आहे. जी धमकी रेकॉर्डवर आहे, त्यावर कारवाई करण्यात येणार का? असा सवाल सुद्धा राम शिंदे यांच्याकडून उपसभापतींना विचारण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये पराभव केला आहे. तेव्हापासून ते आजतागायत या दोन्ही आमदारांमध्ये वाद सुरू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button