अवघ्या काही मिनिटांत ५ लाखांचा धनादेश, मुख्यमंत्र्यांच्या मदतीने संदेशच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू

मुंबई : अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलेल्या जव्हारच्या संदेश पिठोले या बांधकाम मजुराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाच लाख रुपयांचा मदतीचा धनादेश दिला. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिसादाने भारावून गेलेल्या संदेश आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
मुख्यमंत्री शिंदे हे मंत्रालयात बैठकीसाठी आल्यावर त्यांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सामान्य नागरिक येत असतात. यातील प्रत्येकास भेटण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या नियोजित बैठका सुरू झाल्या. लोकप्रतिनीधी, सामान्य नागरिकदेखील त्यांना भेटायला येत होते. या गर्दीतून त्यांचे लक्ष व्हीलचेअरवर बसलेल्या संदेशकडे गेले. त्यांनी थांबून त्याची विचारपूस केली आणि ते नंतर बैठकीसाठी समिती कक्षात आले. विधी व न्याय विभागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा संदेशला व त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली.
यानंतर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून संदेशला मदत देण्यासंबंधी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सबंधित अधिकाऱ्यांना बोलावत त्वरित संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यास सांगितले. या धनादेशावर संबंधित अधिकाऱ्यांनी तिथेच मुख्यमंत्र्यांसमोरच स्वाक्षरी केली आणि संदेशच्या हातात पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला. बांधकाम मजूर असलेल्या संदेशचा कामावर असताना अपघात झाला होता व त्यात त्याने एक हात आणि दोन्ही पाय गमावले. ही मदत केल्यानंतर ‘व्यवसायासाठी स्टॉल सुरू कर. त्यासाठी पालघर येथे सरकारतर्फे जागा मिळू शकेल’, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासाठी बांधकाम महामंडळाकडून संदेशला मदत देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. संदेशला कृत्रिम पाय, हात बसविण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातर्फे मदत करण्यात येणार आहे.