१८ तोळे सोन्याचे दागिने, पिस्तुल जप्त; पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोड्या करणाऱ्या टोळीला दरोडा विरोधी पथकाने केले जेरबंद
पिंपरी-चिंचवडमध्ये दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या टोळीला दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये दरोडा, जबरी चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या टोळीला दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. आरोपीकडून १२ लाख ११ हजारांचे १८ तोळे सोन्याचे दागिने, एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. किरण गुरुनाथ राठोड, अर्जुन कलप्पा सूर्यवंशी आणि संतोष जयहिंद गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील मुख्य आरोपी किरण रघुनाथ राठोड याला दिघी परिसरातून अटक केली. गेल्या आठ ते दहा महिन्यांमध्ये अनेक चोऱ्या केल्याचं तपासात उघड झाले आहे. त्याचबरोबर त्यांचा साथीदार अर्जुन कलप्पा सूर्यवंशी आणि संतोष जय हिंद गुप्ता या दोघांनादेखील ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. आरोपींनी घरफोडीचे पाच गुन्हे केल्याचं कबूल केलं असून एक दरोड्याचा गुन्हादेखील केला असल्याचे पोलीस तपासात समोर आलं.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, अमरीश देशमुख, भारत गोसावी यांच्यासह पोलीस कर्मचारी राजेश कौशल्ये, सुमित देवकर, गणेश सावंत, विनोद वीर, आशिष बनकर, गणेश शिंदे, कोकणे, पुलगम, रासकर, कदम, खांडे, लोखंडे, शेडगे, खारगे, सुपे, रौगे यांनी केली आहे.