पुण्यात ‘एक दिवस डोक्यासाठी’ सुरु; हेल्मेट दिनाच्या दिवशी दुचाकीस्वारांकडून लाखोंचा दंड

दक्ष पोलिस न्यूज प्रतिनिधी पुणे : ‘एक दिवस डोक्यासाठी’ या मोहिमेअंतर्गत शहरात पाळण्यात आलेल्या हेल्मेट दिनाच्या निमित्ताने विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या २२४८ दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला. त्यांना ११ लाख २४ हजार रुपयांचा दंड बजावण्यात आला आहे. शहरातील सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याच्या सूचना ‘पुणे प्रादेशिक परिवहन विभागा’ने (आरटीओ) पूर्वीच दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीतही जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने ‘एक दिवस डोक्यासाठी’ मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एक दिवस हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, आरटीओ यासह विविध राज्य सरकारी कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर हेल्मेट कारवाई करण्यात आली.‘हेल्मेट दिनाच्या दिवशी शहरात हेल्मेट कारवाई केली जाणार आहे,’ असा मेसेज समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यामुळे बुधवारी सकाळपासून नागरिकांमध्ये हेल्मेट कारवाईचीच चर्चा होती.
वाढते रस्ते अपघात आणि हेल्मेटअभावी होणाऱ्या मृत्यूंची संख्या विचारात घेता शहरात बुधवारी लाक्षणिक हेल्मेट दिन पाळण्यात आला. त्यास संमिश्र प्रतिसाद मिळाला.
आरटीओच्या पथकाची ६२२ जणांवर कारवाई
हेल्मेट दिनाच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांच्या बरोबरीने आरटीओचे अधिकारी-कर्मचारी देखील कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. आरटीओचे चार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ४४ सहायक मोटार वाहन निरीक्षक, २५ मोटार वाहन निरीक्षक असे एकूण ७३ अधिकारी कारवाईसाठी विविध कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर दाखल झाले होते.
आणखी दोन दिवस कारवाई
सरकारी कार्यालयांमध्ये विनाहेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारांवर आणखी दोन दिवस कारवाई केली जाणार आहे. वाहतूक पोलिसांकडून चौकांमध्येही काही प्रमाणात दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात आहे. या दरम्यान, दुचाकीस्वारांचे प्रबोधनही करण्यात येणार आहे.
१६२६
वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेले वाहनचालक
६२२
आरटीओच्या पथकाने कारवाई केलेले
२२४८
दिवसभरात कारवाई करण्यात आलेले एकूण वाहनचालक