गर्दीचा फायदा घेऊन रेल्वेत सोनसाखळी चोरणारी बंगाली टोळी अटकेत
गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या एका टोळीतील आठ जणांना वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली.

मुंबई : गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या एका टोळीतील आठ जणांना वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. या टोळीतील आठही आरोपी मुळचे पश्चिम बंगालमधील रहिवासी असून पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला.
गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढले होते. दोन महिन्यांपूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकातही अशाच प्रकारे एका प्रवाशाची सोनसाखळी चोरांनी चोरली होती. याबाबत वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या चोरांचा शोध सुरू केला. फलाटावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात सात – आठजण प्रवाशाला घेरून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी चोरत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी या चोरांचा शोध सुरू केला होता.
दोन दिवसांपूर्वी या टोळीतील काही आरोपी टिळकनगर रेल्वे स्थानकाबाहेर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना अटक केली. सफिक गायन (३७), अजिजूल लक्षर (३५), अलमगीर हुसेन (४७) आणि अबू तडफदार (३७) अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी चौकशीत अन्य काही साथिदारांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी जहांगीर मौला (३७), आशिष प्रधान (३८), मनरुळ शेख (२५) आणि जावेद अख्तर (२५) या चौघांना अटक केली. हे सर्वजण मुळचे पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत.