मुंबई

पालिकेची दादरमध्ये अनधिकृतपणे फुल विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

दादरमधील फुल बाजारातील रस्ता अडवून अनधिकृतपणे फुलांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाने गुरुवारी सकाळी कारवाई केली.

मुंबई : दादरमधील फुल बाजारातील रस्ता अडवून अनधिकृतपणे फुलांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाने गुरुवारी सकाळी कारवाई केली. अतिक्रमण निर्मुलन विभाग आणि घनकचरा विभागाने संयुक्तपणे सकाळी ९ वाजता ही कारवाई केली.

नवरात्र आणि दिवाळी जवळ आल्यामुळे दादरमध्ये फुल विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या वाढू लागली आहे. मीनाताई ठाकरे फुल बाजाराच्या बाहेर रस्त्यावर फुलांची मोठी टोपली घेऊन अनधिकृतपणे फुल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. यामध्ये वाघरी समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. रस्ता अडवल्यामुळे पादचाऱ्यांना चालायलाही जागा मिळत नाही. तसेच हे विक्रेते फुलांचा कचरा तसाच रस्त्यावर टाकून निघून जातात. गेल्याच आठवड्यात जी उत्तर विभागाने फुल बाजारातील व्यापाऱ्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र मंडईबाहेर बसणारे विक्रेते जुमानत नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे घनकचरा विभागाने अतिक्रमण निर्मुलन विभागाची मदत घेऊन गुरुवारी सकाळी ही कारवाई केली.

गुरुवारी सकाळी ९ ते १० या वेळेत हा बाजार सुरू होत असतानाच ही कारवाई करण्यात आली. किमान १५ ते २० विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून सुमारे १०० किलो माल जप्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button