लाखोंचा ऐवज चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, बांगूर नगर पोलिसांची कारवाई

मुंबई : चुटकीसरशी बंद घरात हातसफाई करून परागंदा होणाऱ्या सराईत चोराच्या बांगूर नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मोहम्मद रईस शेख (३६) असे त्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात घरफोडी, चोरीच्या 24 गुन्ह्यांची नोंद आहे.
गोरेगाव लिंक रोड येथील जलमंदिर सोसायटीत राहणारया अलका मेहरोत्रा या कामानिमित्त सकाळी लवकरच घर बंद करून गेल्या होत्या. मात्र संध्याकाळी घरी परतल्यावर घराच्या मुख्य दरवाजाचा कुलूप उचकटलेला तसेच बेडरूममधील कपाट तोडलेले आढळून आले. तसेच कपाटातील ड्रॉवरमधील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा १० लाख २६ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अलका यांनी बांगूर नगर पोलीस ठाणे गाठून घरपडीची तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सहाय्यक आयुक्त रेणुका बागडे, वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तावडे, निरीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश रामेकर, संजय आरोळकर तसेच पथकाने तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळ तसेच परिसरातील ८० सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार रईस शेख असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा माग काढत अखेर त्याला घरातून उचलले. रईसकडून चोरलेल्या ऐवजापैकी ९२ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची व चांदीची लगड हस्तगत केली. रईसविरोधात विविध पोलीस ठाण्यांत तब्बल 24 गुह्यांची नोंद आहे.