कात्रज भागात वाहनांची तोडफोड; कोयता गँगचा पुन्हा हैदोस…
शहरात वाहन तोडफोडीचे सत्र कायम असून, कात्रज भागात वादातून एका सोसायटीच्या परिसरात लावण्यात आलेल्या सहा वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली.
पुणे : शहरात वाहन तोडफोडीचे सत्र कायम असून, कात्रज भागात वादातून एका सोसायटीच्या परिसरात लावण्यात आलेल्या सहा वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे.
मधुकर उर्फ अप्पा ग्यानबा भिलारे (वय ४७), आकाश नानासाहेब गरवडे (वय २७), अमित उत्तम भिलारे (वय ३६), फिरोज हसन शेख (वय २४), मुस्तफा मेहबूब शेख (वय २१, सर्व रा. भिलारेवाडी, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भिमाजी भिकाजी सावंत (वय ३३, रा. ओमसाई निवास, भिलारेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावंत यांचा आरोपींशी वाद झाला होता. आरोपी भिलारे, गरवडे, शेख आणि साथीदार ओम साई निवास सोसायटीच्या परिसरात आले. त्यांनी शिवीगाळ केली. साेसायटीच्या आवारात लावण्यात आलेल्या दोन मोटारी, रिक्षा, दुचाकी, तसेच टँकरवर दगडफेक केली. कोयते आणि बेसबाॅल स्टीक उगारून दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक ढमे तपास करत आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी सहकारनगर भागातील तळजाई वसाहतीत वैमनस्यातून टोळक्याने २६ वाहनांची तोडफोड केली होती. वारजे भागात वाहन तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सहकारनगर, तसेच वारजे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते.