मुंबई एअरपोर्टवरून चप्पला बदलापूरला जाणार होत्या, पोलिसांनी तपासताच चक्रावले; हाती लागलं १ कोटींचं घबाड

मुंबई : मुंबई एअरपोर्टवर कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. इथे चप्पलमध्ये लपवून ठेवलेल्या ९० ग्रॅम कोकेनसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणामध्ये वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा याआधीही काही प्रकरणांमध्ये हात होता. त्यामुळे त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे ड्रग्ज आढळून आले आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आरोपी हे नायजेरियन असल्याची माहिती आहे. चप्पलच्या ३ जोड्यांमध्ये त्यांनी कोकेन लपून ठेवलं होतं. जे कारवाईनंतर जप्त करण्यात आलं आहे. ज्याची एकूण किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई कस्टम झोनच्या विशेष गुप्तचर आणि तपास शाखेने विमानतळावर पाठवलेला माल जप्त केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे पार्सल ठाण्यातील बदलापूर भागामध्ये एका पत्त्यावर पोहोचवलं जाणार होतं. त्यात चप्पलच्या ३ जोड्यांमध्ये ९९ लाख रुपये किंमतीचे कोकेन लपवण्यात आले होते.
पोलिसांच्या ३ दिवसांच्या कारवाईनंतर अखेर आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पार्सल अडवल्यानंतर कस्टम अधिकाऱ्याने एका आरोपीशी संपर्क साधला. तेव्हा त्याने आरोपीला पार्सल बदलापूर इथे पोहोचवण्यासाठी सांगितलं. यातून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.