कांदिवलीतून एटीएम व्हॅनमधून ७८ लाख रुपये लुटून जाणाऱ्याला दोघांना सांगलीतून अटक

दक्ष पोलिस न्यूज प्रतिनिधी (मुंबई) : कांदिवली येथे एटीएम व्हॅनमधून ७८ लाख रुपये लुटून पसार झालेल्या दोघांना मुंबई पोलिसांनी तब्बल ११ वर्षांनंतर अटक केली आहे. अरुण वाघमारे आणि सतीश आगळे अशी या चोरांची नावे असून, पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी दोघांनी आपल्या कुटुंबाशी संपर्क तोडला होता. इतकेच नव्हे, तर विवाहित असूनही त्यांनी दुसरे लग्न करून नवा संसारही थाटला.एटीएम सेंटरमध्ये पैसे भरण्याचे कंत्राट असलेल्या एका कंपनीत अरुण हा चालक म्हणून कामाला होता. तर सतीश हा मदतनीस म्हणून गाडीवर काम करायचा. सन २०१२मध्ये दोघे ठाणे येथून पैसे घेऊन बोरिवली परिसरात आले. बँकेच्या एटीएमजवळ व्हॅन नसल्याचे जीपीएसवरून कंपनीच्या लक्षात आले. त्यांनी शोधाशोध केली असता, अरुण आणि सतीश व्हॅनमधील ७८ लाख रुपये घेऊन ती गाडी कांदिवली परिसरात पार्क करून पळाले होते. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अरुण याच्या कांदिवली येथील घरातून ३८ लाख रुपये जप्त करण्यात आले. मात्र या दोघांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता.
अनेक वर्षे हे दोन्ही गुन्हेगार सापडत नसल्याने पोलिसांनी तपासही बंद केला. मात्र काही दिवसांपूर्वी यातील एका चोराबाबत त्रोटक माहिती कानावर पडली. वरिष्ठ निरीक्षक दिनकर जाधव याच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपशिखा वारे, उपनिरीक्षक नितीन साटम, परमेश्वर चव्हाण, चिरंजीवी नवलू, श्यामराव कापसे, रवींद्र राऊत यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस सांगली भागात पोहोचले. सांगली जिल्ह्यात पोलिसांच्या पथकाची सहा दिवस शोधमोहीम सुरू होती. अखेर सांगलीतून अरुण आणि सतीशला येथून पकडण्यात आले