ठाणे

रुपाली चाकणकरांच्या दाव्याने खळबळ : ठाण्यातील ५३५ महिला अजूनही बेपत्ताच; मानवी तस्करीची भीती!

दक्ष पोलिस न्यूज प्रतिनिधी (ठाणे) : राज्यात मुलींचे गायब होण्याचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. अशा महिला व मुलींचा शोध लागला नाही, तर त्या मानवी तस्करीला बळी पडण्याची भीती आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मंगळवारी येथे सांगितले. ठाणे जिल्ह्यात २०२२मध्ये २४६२ महिला बेपत्ता असल्याची नोंद झाली असून १,९७२ महिलाचा शोध लागला. परंतु अजूनही ५३५ महिलांचा शोध लागलेला नाही.पहिल्या तीन-चार महिन्यांत महिलांचा शोध न लागल्यास कालांतराने त्या मानवी तस्करीला बळी पडतात. आत्तापर्यंत २४ जिल्ह्यांचे दौरे केले, परंतु सर्वाधिक तक्रारी ठाणे जिल्ह्यातील आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या जनसुनावणीमध्ये जिल्ह्यातून १७४ तक्रारी दाखल झाल्या असून या सर्वांच्या तक्रारींवर तातडीने सुनावणी घेऊन संबंधित विभागांना त्याचे निराकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण कमी असले तरी अनेक ठिकाणी लपूनछपून, जन्मतारीख चुकीची दाखवून बालविवाह होत आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ‘इंटर्नल कम्प्लेन्टस कमिटी’ (आयसीसी) स्थापन होणे गरजेचे आहे. परंतु ठाण्यात ते दिसून येत नाही. यासाठी ३ आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. १७४ तक्रारींमध्ये ११६ तक्रारी या वैवाहिक/कौटुंबिक समस्यासंदर्भातील होत्या. तर १८ तक्रारी सामाजिक समस्येच्या, ९ तक्रारी मालमत्ताविषयक, ५ तक्रारी या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाच्या आणि इतर विषयाच्या २६ तक्रारी दाखल झाल्या होत्या.ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक प्रभाग समितीमध्ये स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष आहे का, असा प्रश्न चाकणकर यांनी केला असता महापालिकेच्या उपायुक्तांनी आकडेवारी सांगितली. मात्र माझा या कागदी आकडेवारीवर विश्वास नाही. मी प्रत्यक्ष पाहणी करणार आहे, असे चाकणकर म्हणाल्या. स्वच्छतागृहाची सुविधा मोफत असून स्वच्छतागृहाबाहेर पुरुष असेल किंवा पैसे घेतले जात असतील तर संबंधित विभागावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button