पुणे

माजी नगरसेवक रवि लांडगे यांचा ठाकरे गटात प्रवेश

भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

इच्छुक असलेल्या माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा लढविण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या अजित गव्हाणे यांच्या अडचणीत भर पडली आहे. रवि लांडगे यांच्या प्रवेशामुळे भोसरीतील महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शिवसेना-भाजप युतीमध्ये भोसरी मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता. २००९ आणि २०१४ मध्ये शिवसेनेकडून सुलभा उबाळे यांनी निवडणूक लढविली. मात्र, त्यांचा पराभव झाल्याने २०१९ मध्ये हा मतदारसंघ भाजपकडे गेला. आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी भोसरीवर दावा केला आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. गव्हाणे यांनी प्रचारही सुरू केल्याने भोसरी मतदारसंघ हा पवार गटाला मिळण्याची चर्चा सुरू झाली असतानाच भाजपच्या शहरातील स्थापनेपासून पक्षात कार्यरत असलेल्या आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजविणारे भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुश लांडगे यांचे पुतणे रवि लांडगे यांनी विधानसभा लढविण्यासाठी हातात मशाल घेतली आहे. ते २०१७ मध्ये महापालिकेवर बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून गेले होते.

रवि लांडगे आणि त्यांचे कुटुंबीय हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने, निष्ठावान म्हणून ओळखले जातात. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर रवि लांडगे यांना पदांपासून वंचित रहावे लागले. स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याचा शब्द देण्यात आला. मात्र, ते विधानसभेला दावेदार होईल, या भीतीने ऐनवेळी स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लांडगे यांनी दोन वर्षांपूर्वीच भाजपचा राजीनामा दिला होता. महाविकास आघाडीचे सरकार असताना ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, अजित पवार हेच भाजपसोबत गेल्याने लांडगे यांची अडचण झाली. अखेर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांची विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे.महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार गटाकडून अजित गव्हाणे आणि ठाकरे गटाकडून रवि लांडगे हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे भोसरीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.जनसंघापासून कुटुंबीयांनी भाजपची प्रामाणिकपणे सेवा केली. परंतु, आमदार महेश लांडगे हे भाजपमध्ये आल्यापासून पक्षाचा विचार बाजूला पडला. हुकुम, धडपशाही, सत्तेच्या गैरवापराला कंटाळून भाजपचा समविचारी पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. भोसरीत शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. उमेदवारी दिली तर मी नक्कीच विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचेरवि लांडगे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button