ठाणे

कल्याणमध्ये दुचाकीस्वारांना लुटणाऱ्यांना आंबिवलीमधून अटक

कल्याण – रात्रीच्या वेळेत कल्याण पूर्व भागातून दुचाकीवरून जात असलेल्या वाहन चालकांच्या पाठीमागून जोराचा फटका मारायचा. दुचाकीस्वार खाली पडला की त्याला बेदम मारहाण करून त्याच्या जवळील किमती ऐवज, दुचाकी घेऊन पळून जाणाऱ्या तीनजणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने आंबिवली, उल्हासनगर येथून बुधवारी अटक केली.

प्रेमकुमार घनश्याम गोस्वामी (रा. आंबिवली), सुरज दिलीप विश्वकर्मा (रा. आंबिवली), नाबीर इन्सफअली शेख (रा. उल्हासनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी सांगितले, कल्याण पूर्व भागात राहणारे भीम सिंग (३६) गेल्या महिन्यात कल्याण पूर्व भागातून मलंग रस्त्याने दुचाकीवरून रात्रीच्या वेळेत चालले होते. काकाच्या ढाब्याजवळ त्यांची दुचाकी गेल्यावर तेथे तीनजणांनी भीम यांच्या डोक्यात काठीने जोराने फटका मारून त्यांना दुचाकीवरून खाली पाडले. त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या जवळील पैसे, मोबाईल, स्कुटर घेऊन चोरटे पळून गेले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. अशीच घटना रविवारी शिळफाटा रस्त्यावरील टाटा पाॅवर जवळील देशमुख होम्स भागात घडली होती. अक्लेश चौधरी (३५) रात्रीच्या वेळेत दुचाकीवरून टाटा नाका भागातून चालले होते. त्यावेळी तीनजणांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या जवळील स्कुटर, पैसे लुटून नेले होते. कल्याण गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता. दोन्ही घटना घडल्या तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. त्यांना दोन्ही घटनांमधील तीन इसम सारखेच असल्याचे दिसले.

आरोपी इसमांच्या चेहऱ्याची ओळख पटवून पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला. ते मोहने आंबिवली, उल्हासनगर भागातील रहिवासी असल्याचे वरिष्ठ निरीक्षक शिरसाठ यांना समजले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर, संजय माळी, हवालदार गुरुनाथ जरग, बालाजी शिंदे, विश्वास माने, अनुप कामत, बापूराव जाधव, प्रवीण बागुल, रमाकांत पाटील, श्रीधर हुंडेकरी, किशोर पाटील, विलास कडू, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, मिथुन राठोड, विनोद चन्ने, विजेंद्र नवसारे, बोरकर यांच्या पथकाने आंबिवली, मोहने, उल्हासनगर भागात सापळा लावला. तांत्रिक माहितीच्या आधारे तिन्ही आरोपींना शिताफिने अटक केली. या आरोपींनी मलंग रस्ता, टाटा नाका येथे लुटमारीच्या घटना केल्याची कबुली दिली आहे. या आरोपींवर मानपाडा, खडकपाडा, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून तीन दुचाकी, पाच मोबाईल जप्त करण्यात आल्या. ते सराईत गुन्हेगार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button