मुंबई

मुंबईत अंमलीपदार्थांसह परदेशी नागरिकाला अटक

मुंबई : मालवणी पोलिसांनी अंमलीपदार्थांसह परदेशी नागरिकाला अटक केली असून आरोपीकडून एमडीएमए, एलएसडीसारखे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी अंमलीपदार्थांच्या तस्करीत सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय़ आहे.

मालवणीमधील जनकल्याण नगर येथे एक परदेशी नागरिक अंमलीपदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मालवणी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साळुंखे यांच्या पथकाने गणेश मंदिरासमोरील पदपथकावर सापळा रचला होता. त्यावेळी तेथे परदेशी नागरिक आला. परदेशी नागरिकाला संशय़ आल्यामुळे तो चारकोपच्या दिशेने जाऊ लागला. पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला असता आरोपी पळू लागला. त्यानंतर पोलीस पथकाने पाठलाग करून त्याला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १२ ग्रॅम एमडीएमए, पाच एलएसडी डॉट हे अंमलीपदार्थ सापडले. आरोपीविरोधात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. ग्रॅब्रिएल ओझोमेना (४०) असे अटक आरोपीचे नाव असून याप्रकरणी मालवणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत पाच लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button