कल्याण-डोंबिवलीत ६०० वाहन चालकांवर कारवाई; पाच लाख ७८ हजाराचा दंड एक तासात वसूल
तपासणी मोहिमेत वाहतूक शाखेत पोलीस अधिकारी, हवालदार, वाहतूक सेवक यांना सहभागी करुन घेण्याचे सूचित करण्यात आले होते.

कल्याण: डोंबिवली, कल्याण कोळसेवाडी वाहतूक विभागातर्फे गेल्या दोन दिवसात ठाणे वाहतूक विभाग उपायुक्तांच्या आदेशावरुन अचानक रस्ते, चौकांमध्ये वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. एक तासाच्या अवधीत शहरातील, मुख्य वर्दळीचे रस्ते, चौकात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत डोंबिवली, कोळसेवाडी वाहतूक विभागाने ५८२ वाहन चालकांवर कारवाई केली. या वाहन चालकांकडून पाच लाख ७८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.वाहतूक विभागाचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी कल्याण, डोंबिवलीतील वाहतूक प्रमुखांना शहराच्या विविध भागात जाऊन अचानक वाहन तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. तपासणी मोहिमेत वाहतूक शाखेत पोलीस अधिकारी, हवालदार, वाहतूक सेवक यांना सहभागी करुन घेण्याचे सूचित करण्यात आले होते.या आदेशाप्रमाणे कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा, काटई चौक, लोढा अंतर्गत रस्ता, बदलापूर चौक या भागात २५ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन गुरुवारी अचानक तपासणी मोहीम राबवली. एक तासाच्या अवधीत तपासणी पथकाने मोटार कार चालक, दुचाकी स्वार, अवजड, जड वाहन अशा एकूण ३६७ वाहन चालकांवर कारवाई केली.शिरस्त्राण न घालता दुचाकी चालविणे, दुचाकी चालविताना मोबाईलवर संभाषण, गणवेश न घालता रिक्षा चालविणे, वाहनाची कागदपत्र सोबत न ठेवता वाहन चालविणे, वाहतूक दर्शक न पाळता वाहन पुढे नेणे, काळ्या काचा लावून वाहन चालविणे अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक तासाच्या अवधीत चार लाख १५ हजाराचा दंड मोटार वाहन कायद्याने वसूल करण्यात आला, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले.