रतन टाटा यांना पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार; राज्य सरकारची मोठी घोषणा
उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार दिला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने ही घोषणा केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई : ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारच्यावतीने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येणार असून हा पहिलाच पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना देण्याचा निर्णय झाल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. ‘महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कारासह तरुण, महिला आणि मराठी उद्योजकांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल’, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याच्या दृष्टीने, उद्योगांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘मैत्री’ कक्षाच्या कार्यवाहीत सुधारणा करणारे महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेला सामंत यांनी उत्तर दिले. राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या ११ महिन्यांत राज्यात १ लाख १८ लाख ४२२ कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करून देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य झाले आहे. मागच्या काळात उद्योगधंदे राज्याबाहेर का गेले, यासंदर्भात याच अधिवेशनात श्वेतपत्रिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बारा बलुतेदारांच्या उद्योगांच्या वाढीसाठी रायगड जिल्ह्यात महाड आणि रत्नागिरीला प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबवला जाईल आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती सामंत यांनी यावेळी दिली. विदर्भ, मराठवाडा भागात मोठी औद्यिगिक गुंतवणूक होत असल्याचे उद्योगमंत्र्यांनी नमूद केले.