सव्वा कोटी रुपयांच्या अंमली पदार्थासह नायजेरियन चौकडीला अटक
खारघर पोलीसांनी या प्रकरणी कायदेशीर गुन्हा नोंदवून पुढील तपास सूरु केला आहे.
नव्वीमुंबई : खारघर पोलीसांनी दोन दिवसांपूर्वी मेथाकॉलोन अंमली पदार्थाच्या एक कोटी २९ लाखांच्या मुद्देमालासह चौघांना अटक केली आहे. या प्रकरणातील संशयीत आरोपींमध्ये दोन महिला असून हे चारही नायजेरीयाचे नागरिक आहेत. पोलीस आणि नायजेरीयन नागरिक यांच्यात झालेल्या झटापटीच्या व्हीडीओमुळे समाजमाध्यमांवर पोलीसांच्या धाडसाचे कौतुक होत आहे
खारघर पोलीसांना सेक्टर १२ मधील स्टेट बॅंकेच्यामागे ही चौकडी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजीव शेजवळ यांनी महिला व पुरुष कर्मचा-यांसह त्याठिकाणी सापळा रचला. संशयीत चार जणांकडे वेगवेगळ्या चार पिशव्या होत्या. पोलीसांना या चौघांना ताब्यात घेण्यासाठी झटापट करावी लागली. संशयीत चौघांपैकी दोघांनी पोलीसांना धककाबुकी केली. अखेर या चौघांकडील पिशवीची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे अंमली पदार्थ आढळले. या प्रकरणी अटक केलेल्यांची नावे इक्बुलेम बेनजामीन सुंडेय, सिबाना जोनाथन बेनिन, इखानोबा इम्माकिवेल्ला क्टोल्ड, फल्होर जेरोर्ज अशी आहेत. या चौघांकडे चौकशी केल्यावर त्यांच्याकडे पारपत्र नसल्याचे पोलीसांना समजले. खारघर पोलीसांनी या प्रकरणी कायदेशीर गुन्हा नोंदवून पुढील तपास सूरु केला आहे.