गुन्हेगारी

४६७२ कोटींची डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून उलाढाल, गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक

मुंबई : ॲप्लिकेशनच्या माध्यमातून डब्बा ट्रेडिंग करणाऱ्या ४५ वर्षीय आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कांदिवली पश्चिम परिसरातून अटक केली. गेल्या चार महिन्यांत आरोपीने ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ४,६७२ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी- विक्री केली असून त्या माध्यमातून सरकारचा दोन कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. कांदिवली पश्चिम येथील महावीर नगरमधील ‘संकेत’ इमारतीतील कार्यालयात एक व्यक्ती स्टॉक एक्सचेंजचा अधिकृत परवाना नसताना ‘मुडी’ ॲप्लीकेशनमार्फत अवैधरित्या आर्थिक व्यवहार करीत असल्याचे आणि त्या माध्यमातून सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या ‘कक्ष-११’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांना मिळाली होती.

याबाबत पालिसांनी स्टॉक एक्सचेंजला सूचित केले. त्यानंतर स्टॉक एक्सचेंजमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. याप्रकरणी आरोपी जतीन मेहता (४५) याच्याकडून पाच मोबाइल, एक टॅब, एक लॅपटॉप व ५० हजार रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मेहताने आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्टॉक एक्सचेंजकडून कोणताही परवाना घेतला नसल्याचे निदर्शनास आले. मेहताने ‘मुडी’ ॲप्लीकेशनमार्फत सर्व व्यवहार रोख स्वरूपात केल्याचे निष्पन्न झाले. स्टॉक एक्सचेंजच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याच्या लॅपटॉपची तपासणी करण्यात आली असता मार्चपासून २० जूनपर्यंत आरोपीने ४,६७२ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी – विक्री केल्याचे उघड झाले. मेहताने एकूण एक कोटी ९५ लाख ६४ हजार ८८८ रुपयांचा महसूल बुडवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

शेअर मार्केटमध्ये निर्देशांक व समभागांवर गुंतवणूक व ट्रेडिंग करण्यात येते. शेअर मार्केटमधील निर्देशांकाच्या चढ-उताराचा बेकायदेशीर वापर करून त्यावर एक प्रकारचा सट्टा खेळला जातो. त्यात सर्व व्यवहार रोखीने केले जातात. यामुळे सरकारचा मोठा महसूल व कर बुडतो. रोखीने व्यवहार होत असल्यामुळे त्यात सर्रास काळ्या पैशांचा वापर करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button