पुणे

एमपीएससी करतानाच चमकले, हर्षद-लेशपाल ठरले रिअल हिरो; पुण्यात तरुणीला कोयता हल्ल्यातून वाचवलं

पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे अधिकारी होऊन कर्तव्य बजावण्याचे ध्येय उराशी बाळगून पुण्यात आलेले लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांचा नेहमीप्रमाणे सुरू झाला होता. सकाळी व्यायाम करून ते अभ्यासिकेत जात होते. अद्याप पोलिस अधिकारी नसतानाही हा क्षण कर्तव्य बजावण्याचा ठरू शकतो आणि त्यामुळे कोणाचे तरी प्राण वाचू शकतात, हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते; पण पुढच्या क्षणात असा काही थरार त्यांच्या समोर घडला, की क्षणाचाही विलंब न करता ते कोयतेधारी तरुणाला पकडण्यासाठी धावले. तरुणाचा वार झेलून त्यांनी तरुणीचे प्राण वाचवले आणि समाजाप्रति कर्तव्याच्या त्यांच्या ध्येयाला सुरुवात झाली.

लेशपाल आणि हर्षद  पावणेदहा वाजता सदाशिव पेठेतील विद्यानिकेतन या अभ्यासिकेत जात होते. ही सकाळ त्यांच्यासाठी नेहमीसारखीच होती. ‘वाचवा, वाचवा,’ अशी आरोळी ऐकू आल्याने ते सावध झाले. जीव वाचवत पळत सुटलेली तरुणी लेशपालजवळून गेली. तिच्यामागे कोयता हातात घेतलेला तरुण धावत होता. हे दृश्य पाहून लेशपालने क्षणाचाही विलंब न करता तरुणाचा पाठलाग केला. दुसऱ्या बाजूने हर्षदसुद्धा तरुणाला पकडण्यासाठी धावला. आरोपी तरुण तरुणीवर कोयत्याने वार करणार, इतक्यात लेशपाल आणि हर्षद यांनी त्याला पकडून वार झेलला आणि अनर्थ टळला. तरुणी ‘वाचवा, वाचवा,’ म्हणून आकांताने ओरडत होती; पण एक जण मदतीला धावला नाही. दर्शना पवार प्रकरण ताजे असताना लोक सगळा प्रकार केवळ बघत होते. ‘लोकांची बघ्याची भूमिका ही सामाजिक विकृती असून, ती वाढत आहे,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया लेशपाल याने दिली. पोलिस अधिकारी होण्याची तयारी करीत असताना कर्तव्य बजावता आले, याचे समाधान आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली. आरोपीला पकडल्यानंतर रस्त्यावरील नागरिक आरोपीच्या दिशेने त्याला मारण्याच्या उद्देशाने येत होते. काही जणांनी आरोपीला मिळेल त्या वस्तूने मारहाण केली. या झटापटीत आम्हालाही लागले. आम्ही त्याला प्रक्षुब्ध जमावापासून वाचवून पेरूगेट पोलिस चौकीत नेले, तेव्हा चौकी बंद होती. दार उघडून त्यांनी त्याला आत बंदिस्त केले. ‘दार उघडा, आरोपीला मारायचे आहे,’ असे काही जण म्हणत होते. हा सगळा प्रकार सुरू होता, तेव्हा चौकीत एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हता, असा अनुभव हर्षदने सांगितला. लेशपाल जवळगे माढा तालुक्यातील आडेगावचा आहे. त्याने पुण्यात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. काही वर्षांपासून तो राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहे. पोलिस अधिकारी होण्याचे त्याचे ध्येय आहे. हर्षद पाटील मूळचा धुळ्याचा आहे. त्याने आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. दोन वर्षांपासून तो ‘एमपीएससी’ची तयारी करीत आहे. लेशपाल आणि हर्षदच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून, ठिकठिकाणी त्यांचे सत्कार केले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button