मुंबई

मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आवळल्या मुसक्या; बँकेच्या केवायसीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक,

कैवायसीच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालायचा. झारखंडमध्ये बसून मुंबईतील नागरिकांची फसवणूक करायचा. पण मुंबई पोलिसांनी गुन्हेगाराला हेरलेच.

मुंबई : बँकेची केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या ठगाला बोरीवली पोलिसांनी अखेर झारखंडमधून जेरबंद केले आहे. हुसेन अजगर अली अन्सारी असे अटक आरोपीचे नाव आहे. बोरिवली येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने 8 फेब्रुवारी रोजी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बँकेचे केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली त्यांच्या खात्यातून 2 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. त्यानंतर बोरिवली पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास आणि सूत्रांच्या मदतीने आरोपी झारखंडमध्ये असल्याचे निष्पन्न झाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली पोलिसांनी एक पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने गाव बरडदुब्बा तहसील पालाजोरी जिल्हा देवघर झारखंड येथे छापा टाकला. आरोपी हुसेन अजगर अली अन्सारी हा 14 मोबाईल घेऊन बसला होता. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागला. मात्र पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील यांनी आरोपी हुसेनला फिल्मी स्टाईलमध्ये अर्धा किलोमीटर पाठलाग करुन अटक केली.

आरोपीकडून 14 मोबाईल आणि अनेक सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या खात्यातून आरोपींनी ट्रान्सफर केलेल्या 2 लाख रुपयांपैकी 1 लाख रुपये आयसीआयसीआय बँकेच्या कोलकाता शाखेत गोठवण्यात आले आहेत. या फसवणुकीत आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि त्यांनी आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आहे, याबाबत बोरीवली पोलीस आरोपींकडे चौकशी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button