मनसे-शिवसेना युती होणार ?

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता कोणाच्या गटात हाच मोठा पेच निर्माण झाला आहे. जनतेच्या लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकांमध्ये मत देऊन नेत्यांना निवडून दिल्यानंतरही परस्पर सत्तांतरण होणं यावर मतदारांच्या बोटाला शाई लावण्यापेक्षा चुना लावा अशा आशयाच्या गोष्टी समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणात चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेनेने एकत्र यावे अशी इच्छा मराठी माणसाने फलकांच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यात ज्याप्रकारे फलक लागले होते तशाच आशयाचे फलक आता मुंबईमध्येही लागल्याचे पाहायला मिळाले आहे.
मात्र मनसेचे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, ज्या वेळेस राज ठाकरेंना आवश्यकता होती त्यावेळेस वाईट काळामध्ये शिवसेनेने मनसेचे नऊ नगरसेवक फोडले. मराठी माणसाला दोन्ही भावांनी एकत्र यावे असं वाटत असेल तर या गोष्टीचा त्यावेळेसच विचार करायला हवा होता. आ. राजू पाटील म्हणाले की अशी युती आम्हाला नको, हे एक मनसैनिक म्हणून माझं वक्त्यव्य आहे, असे ते म्हणाले.
मनसे आमदार राजू पाटील यांच्या या वक्तव्यानंतर मनसे आणि शिवसेनेने एकत्र यावे अशी इच्छा नक्की मराठी माणसाची आहे की शिवसेनेची? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मराठी माणसाची इच्छा आणि राजकारणात घडणाऱ्या गोष्टी लक्षात घेऊन मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येतील का? हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.