ठाणे

पोलीस भरतीला खोटी कागदपत्रे, खोट्या आरक्षणाच्या लाभातून निवड यादीमध्ये स्थान; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

ठाणे पोलीस शिपाई भरतीच्या परीक्षेत काही तरुणांनी खोटी कागदपत्रे सादर करत प्रकल्पग्रस्त असल्याचे भासवले. मात्र, निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करताच एका तरुणाचे कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले.

ठाणे : पोलिस दलात भरती होऊन जनतेची सेवा करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उमेदवार गैरमार्ग पत्कारत असून ठाणे पोलिस दलाच्या पोलिस शिपाई पदाच्या भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी चक्क बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर उमेदवारांची ही बनवेगिरी उघड झाली असून या प्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गंभीर बाब म्हणजे, बनावट प्रमाणपत्रांचा आधार घेणाऱ्या उमेदवारांनी अंतिम निवड यादीमध्ये स्थान पटकावले होते. या प्रकरणाची चौकशी चालू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ठाणे पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया नुकतीच पार पडली. या भरतीला तरुणांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला होता. पोलिस शिपाई पदाच्या ५२१ जागांसाठी तब्बल ३९ हजार ३३८ अर्ज आले होते. या भरतीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांना चोख व्यवस्था केली होती. एकूण अर्जांपैकी १ हजार ३८४ उमेदवारांचे अर्ज प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या आरक्षणात आले होते. ९ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडल्यानंतर ५ हजार ८५४ उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली. या उमेदवारांची २ एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. १२ एप्रिल रोजी तात्पुरती निवड यादी प्रकाशित झाल्यानंतर २ मे ला अंतिम निवड यादी जाहीर झाली.

परंतु, पोलिस महासंचालक कार्यालयाने निवड झालेल्या उमेदवारांचे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची सूचना केली. या सूचनेनंतर पोलिस भरतीमध्ये निवड झालेल्या एकूण २७ प्रकल्पग्रस्त उमेदवारांपैकी काही उमेदवारांच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. संबधित विभागांकडून तपासणीचा अहवाल सादर करण्यात. यातील एका उमेदवाराच्या प्रमाणपत्राच्या क्रमांकानुसार हे प्रमाणपत्र अन्य व्यक्तीच्या नावाने जारी केल्याचे आढळले. या उमेदवाराने पोलिस दलात भरती होण्यासाठी बनावट प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र तयार केले. तसेच हे प्रमाणपत्र खोटे असूनही खरे असल्याचे भासवून त्याने पोलिस शिपाई पदाच्या भरतीसाठी वापर केला. शिवाय, प्रकल्पाग्रस्तांसाठी असलेल्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊन संबधित उमेदवाराने अंतिम निवड यादीत स्थान मिळवल्याचे स्पष्ट झाले. या उमेदवाराची किंवा त्याच्या नातेवाईकाची कोणतीही मालमत्ता शासनाने संपादीत केली नसतानाही ती संपादीत केल्याचे भासवले. शासनाची फसवणूक केल्याबद्दल पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर ठाणेनगर पोलिस ठाण्यात या उमेदवारांवर गुन्हा दाखल झाला. हा उमेदवार बीडचा असल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे फसवणूक केल्याप्रकरणी या गुन्ह्यासह आणखी एकूण सहा गुन्हे ठाणे नगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अद्याप कोणालाही अटक झाली नाही.

पोलिस दलात भरती होण्यासाठी उमेदवार गैरप्रकार करत असल्याचे प्रकार यापूर्वी ठाण्यात उघडकीस आले आहेत. जानेवारीमध्ये भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या औरंगाबादच्या एका उमेदवाराने सिरिंजद्वारे औषधी द्रव घेतल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या उमेदवाराला नंतर भरती प्रक्रियेमधून अपात्र करण्यात आले होते. या प्रकारानंतर एका डमी उमेदवाराने पोलिस भरतीची लेखी परीक्षा देण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याच्याकडे मोबाइल, ब्लूटूथ डिव्हाइस कनेक्टर, मिनी इयर बड आदी काही वस्तू सापडल्या होत्या. या डमी उमेदवारासह मूळ उमेदवारांविरुद्ध राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button