मुंबई

स्वातंत्र्यदिनीनिमित्त पुन्हा एकदा घरोघरी तिरंगा

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही देशभरात स्वातंत्र्यदिनी घरोघरी तिरंगा फडकवण्यात येणार आहे.

मुंबई : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही देशभरात स्वातंत्र्यदिनी घरोघरी तिरंगा फडकवण्यात येणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर वर्षभरात राबवण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या अभियानाची सांगता यंदा ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाने होणार आहे. बुधवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान येथे या अभियानाला प्रारंभ होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान गतवर्षभरात राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाने होत आहे. बुधवार, ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९ वाजता मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या अभियानाचा मुख्य सोहळा होणार आहे. तसेच ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तुजतनाच्या विविध कामांचे लोकार्पणही या समारंभात होणार आहे.

या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थिती राहणार आहेत. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह तसेच राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांचेसह विविध लोकप्रतिनिधी, मान्यवर, अधिकारी आदी उपस्थिती राहणार आहे. या समारंभात केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या विहित नमुन्यातील ‘शिलाफलकम’चे अनावरण केले जाईल. तसेच याच ठिकाणी ‘वसुधा वंदन’ अंतर्गत वृक्षारोपण करण्यात येईल. मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत ९ ते १४ ऑगस्टदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानामध्ये मुंबईकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, तसेच यंदाही १३ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरी राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक फडकवावा, असे आवाहन चहल यांनी केले आहे.

ऑगस्ट क्रांती मैदान व सभोवतालच्या परिसराच्या पुरातन वारशांचे जतन करण्याचे काम मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन कक्षातर्फे करण्यात आले आहे. यामध्ये मैदानातील कुंपणभिंती उभारणे, मातीचे पदपथ तयार करणे, मध्य पदपथावर बेसाल्ट दगडाची फरसबंदी, मैदानालगतचे पदपथ मोकळे करणे आणि तेथील दृष्यमानता वाढविणे, भित्तिशिल्पे साकारणे इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व कामांचेही लोकार्पण या समारंभात होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button