ठाणे

कल्याण रेल्वे स्थानकात बालकाचे अपहरण करणाऱ्या नाशिकच्या इसमाला अटक

कचरू वाघमारे असे अटक आरोपीचे नाव आहे.

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात मंगळवारी एका चार वर्षाच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या नाशिकच्या एका इसमाला कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने कल्याण रेल्वे स्थानकात अटक केली. अटक इसमाला चार मुली आहेत. मुलगा नसल्याने त्याने हे मुलाच्या अपहरणाचे कृत्य केले आहे. कचरू वाघमारे असे अटक आरोपीचे नाव आहे. बालकाचे अपहरण झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास पथके तयार केली. बालकासह त्याच्या सोबतच्या मुलींचा शोध घेतला. पोलिसांनी सांगितले, कल्याण रेल्वे स्थानक भागातील झोपडपट्टीत करण आणि पत्नी शुभांगी गुप्ता हे कुटुंब राहते. ते कष्टकरी वर्गातील आहेत. त्यांना दोन वर्षाची मुलगी कीर्ती आणि चार महिन्याचा अथर्व मुलगा आहे. झोपडपट्टीत मंगळवारी सकाळी पाणी न आल्याने गुप्ता कुटुंब दोन्ही मुलांना घेऊन कल्याण रेल्वे स्थानकातील नळ कोंडाळ्यावर पाणी भरणे आणि बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत कपडे धुण्यासाठी आले होते. सोबत त्यांनी आपली दोन्ही मुले आणली होती. मुले नळ कोंडाळ्याच्या जवळ इतर चार लहान मुलींसोबत खेळत होती. चार मुलींचे पालक तेथे बसले होते.

कपडे धुण्यासाठी साबण नव्हता. गुप्ता पती, पत्नीने मुलांच्या बाजुला बसलेल्या पती, पत्नीला मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते स्थानकाच्या बाहेर साबण आणण्यासाठी गेले. परतल्यावर त्यांना नळकोंडाळ्या जवळ खेळणाऱ्या चार मुली आणि स्वताची दोन्ही मुले दिसली नाहीत. त्यांनी रेल्वे स्थानकावर परिसरात शोध घेतला. मुले आढळली नाहीत. करण गुप्ता यांनी तातडीने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास पथके तयार केली.रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलिसांनी तपास सुरू केला. एक जोडपे लहान मुलांना घेऊन रेल्वे स्थानका बाहेर जात असल्याचे पोलिसांना चित्रणात दिसले. रेल्वे स्थानकात साध्या वेशातील पोलीस तैनात होते. कल्याण शहरात रेल्वे पोलीस बेपत्ता मुलांचा शोध घेत होते. मंगळवारी रात्री आठ वाजता गुप्ता कुटुंबाचा बेपत्ता असलेला चार वर्षाचा अथर्व मुलगा कडेवर घेऊन एक इसम फलाट क्रमांक चारवर गस्तीवरील पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला हटकताच त्याने सुरुवातीला मुलगा आपलाच असल्याचा दावा केला.

पोलिसांनी सीसीटीव्हीतील चित्रण तपासून मुलगा गुप्ता कुटुंबीयांचा असल्याची खात्री केली. पोलिसांनी इसमाला पोलीस ठाण्यात आणले. त्याने आपले नाव कचरू वाघमारे असल्याचे सांगितले. आपणास चार मुली आहेत. आपणास मुलगा नाही. त्यामुळे मुलाच्या हव्यासापोटी आपण हे कृत्य केल्याची कबुली कचरुने पोलिसांना दिली. कचरुवर अपहरणाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याने यापूर्वी असे प्रकार केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button