बीडीडी चाळ पुनर्विकासाचं काम वेगानं; पुढल्या वर्षाच्या शेवटापर्यंत घरे मिळणार! आदित्य ठाकरेंनी दिली प्रकल्पाला भेट

मुंबई : शिवसेना नेते, आमदार, आदित्य ठाकरे यांनी आज बीबीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला भेट दिली. यावेळी इथे सुरू असलेल्या इमारतीच्या कामाची पाहणी केली. इमारतीचं २५ व्या मजल्यापर्यंतचं काम झालं असून पुढल्या वर्षाच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होईल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. या कामाला काही पक्ष विरोध करत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्याला आदित्य ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिलं. ‘काही लोकांना चांगल काम होत असताना पोटदुखी असते. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, जनता आमच्या सोबत आहे, या प्रकल्पासोबत आहे’, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ‘उद्धव साहेबांनी याचं उद्घाटन केलं. पहिल्या फेजमध्ये आपण अडीच ते पावणे तीन लाख लोकांना घरे देऊ शकणार आहोत. हे काम वेगानं पूर्ण होणं आवश्यक आहे कारण आमचं वचन होतं तीन वर्षात घरं. ते आपण पाहाता आहात. २५ मजल्यापर्यंत काम पोहोचलं आहे. पुढल्या वर्षाच्या शेवटापर्यंत आपण घरं देऊ शकू मग जिथे जूनी घरं होती ती पाडून मैदान होतील. दुसरा फेज पाठोपाठ सुरू होईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
‘लोकांना चांगली घरं मिळावित त्यांच्या हक्काची घरं मिळावित. आज मी जाऊन आलो त्यांनी तसा फ्लॅट तयार केला आहे. सगळ्या बाजूंनी चांगला उजेड, वारा, रुंद जीने, चांगले पॅसेज दोन बेडरून, दोन बाथरूम, किचन, हॉल… या परिसरात एवढा दर न देता मोफत त्यांना राहायला मिळणार आहे’, असं आदित्य ठाकरे म्हणाले. पार्किंगच्या संदर्भात काही संघटनांनी आक्षेप घेतला. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी सविस्तर माहिती दिली. ‘मुंबईसह सर्वच शहरांमध्ये पार्किंगची समस्या मोठी आहे. आधीच्या डीसीआरमध्ये चार फ्लॅटला एक पार्किंग होतं ते आपण बीडीडीसाठी दोनवर आणलं आहे. काही संघटनांनी चार मजले अंडरग्राउंड पार्किंगची मागणी केली होती. मात्र तिथले लाईट, व्हेटिलेशन यासाठीचा सततचा खर्च कोण देणार, स्वच्छता कशी राहणार हा प्रश्न होता. तसं केलं असतं तर या बिल्डिंग आता दिसल्या नसत्या. आता पोडिअम पार्किंग आणि बीडीडीसाठी खासकरून दोन घरांसाठी एक पार्किंग जेव्हा आपण केलं तेव्हा आपण पाहिलं की खर्च कमी आणि वेग वाढला. जेवढं आपण करू शकत होत ते आपण केलं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना ‘भविष्यात गरजा वाढत जातील तसं आपण देत जाऊ. जसं शक्य होईल तसं वाढत जाईल’, असंही आदित्य म्हणाले. डीलाई रोडच्या बीडीडीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, तिथे देखील गेलो होतो. तिथे पायलिंगचं काम सुरू आहे. तिथे अंडरग्राउंड पार्किंग आहे. पोडियम पार्किंगची तिथे संधी नाही मिळाली. त्यामुळे तिथं अजून पार्किंगमधून आपण वर येत आहोत. तिथे काम थोडं हळू असलं तरी काम सुरू आहे. तिथे हा अंडरग्राउंड पार्किंगचा प्रकार असल्याने वेळ लागत आहे, पण काम सुरू आहे’, असं ते म्हणाले.